सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसमोर मांडली जोरदार बाजू

खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समितीचे निवेदन

Sudarshan MH
  • Jan 9 2021 2:16PM
बुलढाणा : मागील ११० वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मध्य रेल्वे झोनचे पथक दोन दिवसांपूर्वी जालना येथे दाखल झाले. गुरुवार दि. ७ जानेवारी रोजी या पथकाने चिखली येथे भेट दिली. या भेटीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी, व्यापारी, उद्योजक, पत्रकार आणि नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने सर्वेक्षण पथकातील अधिकार्‍यांना निवेदन दिले. यामध्ये खामगाव - जालना रेल्वेमार्गाची आवश्यकता स्पष्ट करणारी बाजू जोरदारपणे मांडण्यात आली.
       खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी वाहतूक सर्वेक्षण करणारे पथक मध्य रेल्वेचे उप मुख्य परिचालन प्रबंधक ( सर्वेक्षण ) सुरेश चंद्र जैन यांच्या नेतृत्वात पाच अधिकार्‍यांचे पथक ७ जानेवारी रोजी चिखली येथे दाखल झाले. या भागातून होणारी मालवाहतूक हा या सर्वेक्षणाचा मुख्य विषय आहे. एम. आय. डी. सी. परिसराची पाहणी करून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. या वेळी पथकाचे प्रमुख सुरेश चंद्र जैन यांनी स्थानिकांशी संवाद साधला. शेतकरी, उद्योजक, व्यापारी, पत्रकार आणि विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या समस्या आणि विचार मांडले. या प्रसंगी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
जिल्ह्य़ातील जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करणारा अहवाल मांडा
       गेल्या १५ वर्षांपासून रेल्वे लोकआंदोलन समिती खामगाव - जालना रेल्वेमार्गासाठी सातत्याने संघर्ष व पाठपुरावा करत आहे. आपल्या मागणीसाठी समितीने दोन वर्षांपूर्वी १२ दिवस चिखली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन देखील केले. आज दिलेल्या निवेदनात या रेल्वेमार्गाच्या संदर्भात महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या. हा रेल्वेमार्ग खामगाव पासून पुढे शेगाव पर्यंत वाढवला जावा, बरेच शेतकरी आपला शेतमाल, धान्य, फळे, भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत न विकता दलालांमार्फत किंवा स्वतंत्रपणे विकतात याची नोंद देखील अहवालात घेतली जावी, खाजगी बाजार समिती, जिनिंग फॅक्टरी येथून मोठ्या प्रमाणात धान्य आणि कापसाची खरेदी, विक्री व वाहतूक होते, याची दखल घेतली जावी, मागास भागाच्या औद्योगिक विकासासाठी रस्ता आणि रेल्वेमार्ग ही दळणवळण सुविधा आवश्यक असते. अशाच ठिकाणी नवीन उद्योग सुरू होतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने सर्वेक्षणाचे निकष बदलावे जेणेकरुन मागास भागाचा विकास साधला जाईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली. याशिवाय उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा रेल्वेमार्ग साकारण्यासाठी सर्वेक्षण पथकाने सकारात्मक अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करावा अशी मागणी रेल्वे लोकआंदोलन समितीने या निवेदनातून केली आहे. डॉ. किशोर वळसे, रेणुकादास मुळे, संतोष लोखंडे, अनुप महाजन, संतोष अग्रवाल, भारत दानवे आणि कैलास शर्मा यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
सकारात्मक अहवाल पाठवणार - सुरेश चंद्र जैन
       रेल्वे मंत्रालयाकडून आलेले अधिकारी सुरेश चंद्र जैन यांनी उपस्थितांच्या अपेक्षा, सूचना व मागण्या ऐकून घेतल्या. बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक सचोटीने आपापली कामे करत असून हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा अशी येथील जनतेची अपेक्षा असल्याचे आपल्याला जाणवल्याचे त्यांनी सांगितले. खामगाव पासून जालन्यापर्यंत औद्योगिकीकरणाला भरपूर वाव असून येथील शेतमालाला दूरपर्यंत मागणी असल्याची बाब आपल्याला आढळून आल्याचे ते म्हणाले. आगामी तीन महिन्यात मध्य रेल्वेकडे आपण आपल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करणार असून तो निश्चितच सकारात्मक असेल, अशी ग्वाही सुरेश चंद्र जैन यांनी या प्रसंगी दिली. 
        कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रेल्वे लोकआंदोलन समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात सर्वेक्षण पथकाचे प्रमुख सुरेश चंद्र जैन यांनी उपस्थितांच्या अपेक्षा, सूचना व मागण्या ऐकून घेतल्या. खा. प्रतापराव जाधव, माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, माजी आमदार राहुल बोंद्रे, सिंदखेड राजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, उपसभापती राजीव जावळे, एम. आय. डी. सी. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, अडत व्यापारी संघटनेचे शिवाजी देशमुख, हमाल संघटनेचे अध्यक्ष गजानन पवार, सूर्यकांत मेहेत्रे, पत्रकार विजय गोंधणे, यांनी देखील या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. चिखली व्यापारी संघटना, एम. आय. डी. सी. उद्योजक संघटना, तालुका पत्रकार संघ, अडत व्यापारी संघटना आदी विविध संघटनांतर्फे जैन यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
     या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, शंतनू बोंद्रे, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ बोंद्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, शैलेश बाहेती, राजेंद्र व्यास, नंदू कर्‍हाडे आदी विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुकादास मुळे यांनी केले तर डॉ. किशोर वळसे यांनी आभार मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार