नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी त्यांनी मोदींशी बोलून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला "पूर्ण पाठिंबा" दिला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. पहलगामच्या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा झाली पाहिजे, यावर अध्यक्ष पुतिन यांनी भर दिला.
संभाषणा दरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत - रशिया विशेष आणि विशेषाधिकारित धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त पुतिन यांना शुभेच्छा दिल्या आणि वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या २३ व्या भारत - रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केले.