सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात नंदुरबारचे महत्वपूर्ण योगदान* *आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत*

भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न*

Nandurbar. MH
  • Aug 15 2022 11:51AM


नंदुरबार, दि.15 (जिमाका वृत्तसेवा) : भारत स्वतंत्र होऊन आज बरोबर 75 वर्षे झाली. त्यामुळे आपण वर्षभर भारतीय स्वातंत्र्यांचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. त्यात आपल्या नंदुरबार जिल्ह्याचेही महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी भारतीय स्वांतत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी केले.

या वर्धापन दिन सोहळ्याला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ. हिनाताई गावीत, जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी,  जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जात पडताळणी समितीचे सहआयुक्त अर्जुन चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, माजी जि.प अध्यक्षा कुमूदिनी गावीत, जि.प सदस्या सुप्रिया गावीत आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावीत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गौरवशाली इतिहास आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. नंदुरबार-धुळे जिल्ह्याही या लढ्यात मागे नव्हता, नंदुरबार जिल्ह्यातील शहीद शिरीषकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बलिदान कुणीच विसरू शकणार नाही. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेत अनेकांनी या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले योगदान दिले. आजही नंदुरबार म्हटले म्हणजे शहीद शिरीषकुमार यांचे नाव आर्वजुन घेतले जाते. 

शेजारील धुळे जिल्ह्यातील चिमठाणे गावाजवळ ब्रिटिशांचा खजिना क्रांतिकारकांनी जीवावर उदार होवून लुटला तर सातपुडा पर्वतरांगातील 2 मार्च 1943 रोजी रावलापाणी येथे घडलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासींचे बलिदान आठवण करून देते. बिरसा मुंडा आणि आदिवासी स्वातंत्र्य योद्ध्यांनी ब्रिटिशांविरुद्ध झारखंडमध्ये केलेल्या आंदोलनाचा इथे आवर्जुन उल्लेख करावा लागेल. अशा अनेकांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. अशा सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरून चालणार नाही. आज आपल्याला त्यांच्यामुळेच भयमुक्त वातावरणात विकास साधता येत आहे. अशा सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो असे ते म्हटले.

सीमेवर लढणारा प्रत्येक सैनिक, शेतात राबणारा शेतकरी, कारखान्यात काम करणारा कामगार, वैज्ञानिक, शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, कलावंत, खेळाडू, लोकप्रतिनीधी, अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्व प्रकारची सेवा पुरविणारे व्यावसायिक, माध्यमे अशा सर्वांचे देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान आहे. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून आपला सहभाग नोंदविला आहे. याबद्दलही मी सर्वांचे आभार मानतो. 

आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांच्या बळावर आपण चांगल्या आरोग्य सुविधा उभ्या करून कोरोना सारख्या विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळविले. संभाव्य लाटेचा धोका टाळण्यासाठी अजूनही सतर्क राहणे आवश्यक आहे. याकरीता प्रत्येकाने आपले लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 31 हजार 873 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस, 7 लाख 87 हजार 369 व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस तर 52 हजार 809 व्यक्तींना बूस्टर डोस घेतला आहे. स्वांतत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलै पासून पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस (बुस्टर डोस) केंद्र सरकारमार्फत मोफत देण्यात येत असून यांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, सुसज्ज ग्रंथालय, ट्रामा केअर सेंटर, नेत्र रुग्णालय, रक्तपेढी, आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती अशा विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. आगामी काळात पायाभूत सोयीसुविधा वाढविण्यावर भर देण्यात येईल. 

शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू नागरिकांना कोरोनाच्या संकट काळात जिल्ह्यातील 16 केंद्रातून आतापर्यंत 3 लाख 37 हजार 78 थाळ्यांचे मोफत वाटप केले तर 19 केंद्रातून आतापर्यंत सुमारे 13 लाख 21 हजार 420 थाळ्यांचे वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 2 लाख 76 हजार 725 शिधापत्रिकाधारकांना 87 हजार 81 मे. टन तांदूळ, तर 42 हजार 638 मे. टन गव्हाचे मोफत वाटप करण्यात आले.

मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांनी आपले मतदानकार्ड आधारकार्डाशी  ऐच्छिकपणे जोडणीची मोहीम एक ऑगस्टपासून सुरु करण्यात आली असून आज पर्यंत 15 हजार 621 नागरिकांनी आपले आधार मतदानकार्डाशी जोडले आहे. उर्वरित नागरिकांनी आपले मतदानकार्ड आधारकार्डशी जोडून घ्यावे. यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 85 टक्के पाऊस आतापर्यंत झाला असून 2 लाख 77 हजार 596 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी 26 हजार 850 शेतकऱ्यांना 377 कोटी 78 लक्ष 86 हजार रुपयांचे पीक कर्जाचे आतापर्यंत वितरण केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारापर्यत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यमंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 1 लाख 30 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता पर्यंत 11 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये नंदुरबार तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्याने शेतपिकांचे नुकसान झालेल्या 49 हजार 745 शेतकऱ्यांना 50 कोटी 57 लाख 33 हजाराची मदतीचे वाटप करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात जून ते जुलै 2022 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पशुहानीसाठी 2 लाख 35 हजार, मनुष्यहानीकरीता 16 लाख तसेच घरपडझडीसाठी 14 लाख 70 हजारांचे वाटप करण्यात आले आहे. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी  राहील याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2022-2023 यावर्षांसाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, बिगर आदिवासी उपयोजनेमध्ये, स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमामध्ये एकूण 535 कोटी 41 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

समारंभानंतर मंत्री डॉ. गावीत यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे व सुश्रुत नर्सिग होम, शहादा येथील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर जागतिक स्तनपान सप्ताह शिशु यांच्या वजनात वाढ होण्यासाठी कार्यशाळेत उल्लेखनिय कामगिरीबाबत आरोग्य विभागातील डॉ. जितेंद्र बिरारे, डॉ. मनीष नांद्रे तसेच आशासेविका श्रीमती अनिता जगदेव यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी एस.ए.मिशन हायस्कुल, ॲग्लो उर्दु हायस्कुल, जि.प.प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. यावेळी जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार