सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी करावे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

Shruti Patil
  • Dec 2 2023 8:00AM
नागपूर (दि. १): माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबुत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी बनविण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करुन जागतिक स्तरावर नाविन्यपूर्णतेचे केंद्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. 
 
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यावेळी उपस्थित होते.
 
नव्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची गरज प्रतिपादित करुन राष्ट्रपती म्हणाल्या, वैश्विक स्तरावर सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय साध्य करण्यात डॉक्टरांची अपुरी संख्या हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा लाभ प्राप्त होण्यात असमानता निर्माण झाली आहे. ती दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालय संलग्नित वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास मदत केली जात आहे. यामुळे प्रादेशिक असमतोल आणि शहरी-ग्रामीण दरी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य सेवांच्या विकासासोबतच त्या परवडणाऱ्या असाव्यात, या उद्देशाने जगात सर्वात मोठी असणारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य विषयक दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्याचे सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
अवयवदानाबाबत समाजात पुरेशी जागरुकता नसल्याने गरजू रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र त्यासोबतच अवैधरित्या अवयव विक्रीचे प्रकारही घडत असल्याबाबत खंत व्यक्त करुन वैद्यकीय क्षेत्राने अवयवदानासाठी जनजागृती करावी तसेच मानसिक आरोग्याच्या समस्येचाही सहानूभूतीने विचार करावा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. 
 
मध्य भारतात गेल्या 75 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या वैद्यकांची मोठी फळी निर्माण केल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. 
 
 वैद्यकीय महाविद्यालयाच्या नुतनीकरणासाठी शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. गडकरी म्हणाले, नव्या सुविधांनी सुसज्ज होणारे हे रुग्णालय व महाविद्यालय वाढती गरज भागवू शकणार आहे. या महाविद्यालयाने नागपुरसह लगतच्या राज्यातही उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिली असून विशेषत: कोविडकाळातील योगदान प्रशंसनीय आहे. पूर्व विदर्भात सिकलसेल, थॅलेसेमियाचे रुग्ण लक्षणीय संख्येने आढळून येतात. अमृत महोत्सवाचे औचित्य साधत लवकरच बोन मॅरो विषयक उपचार सुविधेची सुरुवात होणार आहे. 
 
स्थापनेवेळी आशियातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय अशी ओळख असणाऱ्या या संस्थेने प्रारंभापासूनच सेवाभाव जपत असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ही देशातील एक महत्वाची वैद्यकीय संस्था असून अनेक विख्यात तज्ज्ञ या संस्थेने दिल्याचा विशेष उल्लेख करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविद्यालयाच्या सुविधांमध्ये काळानुरूप बदलाची गरज होती. यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाला नवे स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शासनाकडून ५५० कोटींचा निधी देण्यात आला असून लवकरच कायापालट होणार आहे.
 
एक अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून त्यास नवे रुप मिळणार आहे. त्याअंतर्गत शस्त्रक्रिया कक्ष, अद्ययावत यंत्र सामग्री, वसतिगृह, नवीन इमारती, क्रीडांगण, कॅन्सर इन्स्टिट्युट आदींची उपलब्धतता होणार असून पुढील ५० वर्षांची गरज या निमित्ताने पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात या संस्थेचे योगदान मोलाचे ठरणार आहे. आयजीएमसीसाठीही ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
 दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्यात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती देऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, निवासी वैद्यकीय अधिका-यांची १ हजार ४३२ पदांची पदभरती होणार आहे. या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यासोबतच नवीन प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आशियाई विकास बँकेमार्फत चार हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बी.एसस्सी नर्सिग अ्भ्यासक्रम सुरू करण्यात येईल. नर्सिंग, तांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील 5 हजार 182 पदांची भरती प्रकिया पूर्ण झाली असून लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.
 
तत्पूर्वी, महाविद्यालयांशी संबधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महाविद्यालयातून उत्तीर्ण पहिल्या तुकडीचे विद्यार्थी डॉ. बी. जे. सुभेदार, महाविद्यालयासाठी जमीन दान करणारे कर्नल डॅा. कुकडे यांचे नातू ॲड.दिनकर कुकडे आणि या महाविद्यालयाला मदत करणाऱ्या डॉ. शकुंतला गोखले यांचे नातेवाईक रवी लिमये व डॉ. प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनिर्मित सभागृहाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटनही करण्यात आले. विशेष डाक तिकीटाचे अनावरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मरणिका आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॅा. राज गजभिये यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार