भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या आघाडीच्या जोडीने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला मात्र पराभव पत्करावा लागल्याने भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित सात्त्विक-चिराग जोडीने आक्रमक खेळ करतांना इंडोनेशियाच्या १३ व्या मानांकित लिओ रॉली कार्नाडो - डॅनिएल मार्टिन जोडीचा २१-१६, २१-१४ असा पराभव केला.
भारतीय जोडीने या वर्षी इंडोनेशिया, कोरिया आणि स्विस स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. आता उपांत्य फेरीत भारतीय जोडीसमोर चीनच्या हे जी टिंग-रेन शिआंग यू जोडीचे आव्हान असेल. टिंग-यू जोडीने आपल्याच देशाच्या आठव्या मानांकित लियू यू शेन-ओऊ शुआन यी जोडीला २१-१५, २१-१५ असे पराभूत केले.पुरुष एकेरीत भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. प्रणॉयला जपानच्या कोडाई नाराओकाकडून ९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.