सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार लोकमान्य टिळक

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या थोर महात्म्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांच्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्या अर्थाने भारतीय स्वरूप दिले.

Snehal Joshi .
  • Jul 22 2021 9:54PM

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या थोर महात्म्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांच्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्या अर्थाने भारतीय स्वरूप दिले. त्यांनी आपल्या तरुण वयातच समाज सुधारणांसाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पाउले उचलली. लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान असून आपल्या आयुष्याचा क्षण-क्षण देशासाठी वेचतांनाच त्यांनी क्रांतीकारकांची नवी पिढी घडवली. 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या प्रयत्नवादाचा जनक लोकमान्य टिळक बनले आणि त्यांची ती सिंहगर्जना इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी कोरली गेली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता व राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणून लोकमान्य टिळक ख्यातनाम आहेत. ब्रिटीश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत. लोकांनी त्यांच्या विचारांना, कार्याला मान्य केलेले म्हणून ते लोकमान्य झाले. लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे जन्मनाव केशव परंतु त्यांचे बाळ हे नावच पुढे रूढ झाले. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई होते. बाळ गंगाधर टिळकांचे पारंपारिक संस्कृत शिक्षण घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यात झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. सन १८७१ मध्ये कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (तापीबाई ) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुण्यात राहूनच ते सन १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तर सन १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. डेक्कन कॉलेजमध्ये असतांना बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचा स्नेह जमला होता. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला होता. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते, तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. त्यांनी १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्याठिकाणी टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रारंभ त्यांच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेपासून आधुनिक भारतात झाला. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील सर्व स्तरावरील शिक्षण राष्ट्रीय शिक्षण असावे असे अत्यंत मूलगामी विचार टिळकांनी व्यक्त केले. पुढे चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि मराठीतून केसरी व इंग्रजीतून मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले. लोकमान्य टिळक व गोपाळ आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत. या काळात आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत होते. परंतु लोकमान्य टिळकांना राजकीय सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या. स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे, तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी त्यातील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती. स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादीत असे. त्यामुळेच त्यांनी राजकीय सुधारणांना प्राधान्य दिले. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असे त्यांचे म्हणणे नव्हते, पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे असा त्यांचा विचार होता. लोकमान्य टिळकांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. याकरिता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्यायावर वृत्तपत्रातून उघड टीका करून कायद्याची मर्यादा त्यांनी प्रथम सांभाळली. जनतेचा ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्रप्रेम चेतवून स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी संघर्ष करावा लागला. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य हा लोकमान्य टिळकांचा संकल्प होता. त्यासाठी ते झटले. केसरी व मराठा या वृत्तपत्रातून आपल्या तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात्त प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे मांडले. इंग्रज सरकारचे पक्षपाती धोरण तसेच फोडा आणि झोडा ही नीतीच समाजात पेटलेल्या वादांना कारणीभूत आहे असे त्यांचे मत होते. म्हणून नेहमी आपसात न भांडता स्वातंत्र्याचा हेतू समोर ठेऊन सर्वांनी सुख, संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कास जपावे असे आपल्या विचारांनी त्यांनी समाजाला पटवून दिले. भारतीय स्वातंत्र्यासाठी लोकजागृतीचे साधने म्हणून गणपती उत्सव व शिवजयंती या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना त्यांनी प्रथम मांडली. केसरीच्या दोन अंकातून या उत्सवाचे त्यांनी राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्यकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांची ज्ञान सामान्यजनांना करून देणे हे उद्देश स्पष्ट केले. जनतेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी टिळकांनी या उत्सवांची सुरुवात केली. ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि दशा बदलली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. सत्याची बाजू मांडताना व स्वातंत्र्यासाठी लढतांना त्यांना अनेकदा कारागृहाची शिक्षा भोगावी लागली तरी ते डगमगले नाही. आपले कार्य निरंतर करत राहिले. देशसेवेसाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या या थोर पुरुषाचे कार्य महान आहे. आपल्या जीवनकाळात टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वांॾमयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाची उत्कृष्ट प्रतिबिंब गीतारहस्यात पहावयास मिळते. राजकीय क्षेत्रात टिळक कार्य करीत असतांना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली आहे. त्यांचे प्रमुख ग्रंथ गीतारहस्य, ओरायन, आर्टिक होम इन वेदाज आणि वेदांगज्योतिष असे आहेत. आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान होय. गांधींच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय, सांस्कृतिक कार्याला अनुकूल पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना द्यावे लागते. म्हणूनच आधुनिक भारताच्या इतिहासात लोकमान्य टिळकांचा जीवन काळ म्हणजेच टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानला जातो. लोकमान्य टिळक हे विद्वान, विचारवंत, तत्त्वज्ञ, यशस्वी पत्रकार आणि समाजसुधारक होते. या थोर पुरुषाचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. भारत आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय जनमानस समजून घेणारे लोकमान्य आजही तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य, विचार समाजाला मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. थोरपुरूष, राष्ट्रसंजीवक लोकमान्य टिळकांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

*निलेशकुमार रामभाऊजी इंगोले*

मोर्शी, जि. अमरावती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार