पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढु येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. या समाधीस्थळी 110 कोटी 76 लाख रुपये खर्चून संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने, छत्रपती संभाजी महाराज यांचे 60 ते 65 फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची आणि साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास आपल्या हातून व्हावा यासाठीच राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात यावे लागले. महाराजांचे नेतृत्व, कर्तृत्व हे अनन्यसाधारण असून त्यांच्या लौकिकाला साजेसे समाधीस्थळ उभारण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपले भाग्य असल्याचे मत व्यक्त केले. संभाजी महाराजांच्या कार्याचा यथार्थ गौरव करणारे स्मारक याठिकाणी उभारले जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी सहकार मंत्री दिलप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे मिलिद एकबोटे हेदेखील उपस्थित होते.