सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नितीन गडकरी-प्रत्येक श्वास प्रगतीचा ध्यास--शुभांग गोरे

आज श्री नितीन गडकरी ६४ वर्षांचे झाले. या निमित्ताने त्यांच्या प्रगतीचा आलेख डोळयासमोर येतोय.

Sudarshan MH
  • May 27 2021 10:34AM


नीलम फर्निचर या नावाने व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. नितीनजींचे दुकान, विद्यार्थी परिषदेच्या  कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे, रोज संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर,  त्यांची मैफिल विद्यार्थी परिषद कार्यालयात जमायची.



 आज श्री नितीन गडकरी ६४ वर्षांचे झाले. या निमित्ताने त्यांच्या प्रगतीचा आलेख डोळयासमोर येतोय. मी जेंव्हा १९८२ मधे नागपुरात आलो तेंव्हा नितीनजी विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ता या श्रेणीत आलेले होते. त्यांच्याकडे बाल्यावस्थेत असलेल्या नागपुरच्या भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी होती. त्यांनी भागीदारीमधे नीलम फर्निचर या नावाने व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. नितीनजींचे दुकान, विद्यार्थी परिषदेच्या  कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे, रोज संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर,  त्यांची मैफिल विद्यार्थी परिषद कार्यालयात जमायची.आधी थोडा वेळ, परिषदेच्या कामाची चर्चा व्हायची. मग गप्पांचा खरा फड जमायचा. नितीनजी पहिल्यापासूनच जातिवंत खवय्ये.   त्यामुळे, त्या दिवशी, नितीनजींच्या खिशात जसे पैसे असतील, त्याप्रमाणे, काही तरी मागवले जायचे आणि त्याचा फडशा पाडत गप्पा रंगायच्या.  आपल्या खास खणखणीत आवाजात आणि अधुनमधून गडगडाटी हास्यात ते अनेक क़िस्से खुप छान रंगवायचे. त्यांची खासियत म्हणजे, जितक्या मिश्किलपणे, ते  इतरांच्या फजितीचे किस्से रंगवत, तितक्याच दिलदारपणे, स्वतःच्या फजितीच्या गमतीजमती पण सांगत.विद्यार्थी परिषदेचे काम करत असतांना, खूप वेळा कार्यक्रमांसाठी अनेक गोष्टी उधारीवर आणाव्या लागत. त्यावेळी  एकूणच, परिषदेची मिळकत इतकी तुटपुंजी असायची, कि उधारी करणे, आणि ती वेळेवर फेडली न जाणे, अपरिहार्यच असायचे. आणि बऱ्याच वेळा, नितीनजींनी त्यासाठी आपली पत वापरलेली असायची. पण हेही तितकेच खरे होतं कि नितीनजींची कामातील तळमळ व नियत अतिशय साफ आणि सच्ची असल्यामुळे, घेणेकऱ्यांना  "यह उधारीभी अच्छी है" असे वाटत असावे. आज आपण पाहतो कि स्वतःला गरीबांचे मसीहा आणि साम्यवादी म्हणवून घेणारे तथाकथित विद्यार्थी नेते, 30-30 लाखांच्या महागड्या गाड्यांमधून फिरतात. पण नितीनजी विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री असतांना,आणि नंतर सुद्धा काही वर्षे, त्यांच्या, शॉक अब्सॉर्बर नसलेल्या जुन्या लुनावरच सर्वत्र संचार करीत, मग ती विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक असो, अथवा, विद्यार्थी परिषदेचा कोणता कार्यक्रम.

त्या काळात जरी नितीनजी व्यवसायात खूप संघर्ष करत होते, तरी मनाशी, त्यांनी एक खूणगाठ बांधली होती. त्यांना, आपण, व इतर कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मोठं उद्योगपती व्हावं असं वाटत होतं. त्यांचा विश्वास होता कि जर तुम्ही आर्थिकदृष्टया सम्पन्न असाल तर तुम्ही कामाकड़े निर्धास्तपणे लक्ष देऊ शकता, आणि तुमची आर्थिक क्षमता, कार्याला पत आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देते. 

त्यामुळे त्यांनी अगदी सुरवातीपासुन निरनिराळ्या लोकांसमवेत काही उद्योग सुरु केले. सगळेच उद्योग यशस्वी झाले असं नाही. परंतु त्यानी प्रयत्न मात्र कधीच सोडले नाहीत. उलट, राज्याचे मंत्री झाल्यावर तर, आपल्या सत्तेचा आणि संपर्काचा उपयोग, विदर्भातील उद्योजकीकरण व औद्योगिकीकरणासाठी कसा करुन घेता येईल, विदर्भातील विविध संसाधनांवर आधारित कोणते उद्योग सुरु करता येऊ शकतात, देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे, त्याचा फायदा कसा करुन घेता येईल, याचाच विचार ते सतत करत असायचे. या संबंधात मला एक किस्सा आठवतो.
मी त्यावेळी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. ऐक दिवस, स्कूटरने कार्यालयात जात असतांना अचानक  एक लाल दिव्याची गाडी शेजारून गेली आणि कचकन ब्रेक च‍ा आवाज आला आणि गाडी थांबली.  पाहतो तर, नितीनजी मला खुणेने बोलवत होते. नितीनजींनी मला सांगितले कि आपल्या भागात होणाऱ्या अन्नधान्य व फळ-भाजीपाला वर आधारित जे प्रक्रिया उद्योग होऊ शकतील, अशा उद्योगांच्या प्रकल्प पत्रिका मला आणून दे. ज्या स्तराच्या आणि क्षमतेचे उद्योग, त्यांना अपेक्षित होते, ते पाहता, ही माहिती नक्कीच स्वत:साठी नको होती. पण त्यांच्या मनात नक्कीच कोणत्या भागातील/समुहातील लोक त्यांच्या मनात असतील, जे अशा प्रकारचे उद्योग सुरु करु शकतील. यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. नितीनजींची दृष्टी आणि मन सतत, कृतिशील आणि विकासाभिमुख असतं.
नितीनजींना महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून उणीपुरी चार वर्षे मिळाली. एरवी ज्या खात्याची चर्चा, मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी किती माया जमवली, हीच चर्चा व्हायची, त्या विभागाची चर्चा आता किती शे उड्डाणपुल, किती कमी खर्चात व विक्रमी कमी वेळात बांधले याबद्दल होऊ लागली. मुम्बई-पुणे दृतगती महामार्ग तर त्यांच्या या मंत्रीपदाच्या काळातील मानाचा शिरपेच होता.

या नंतरचा दहा वर्षाचा काळ, नितीनजींनी खऱ्या अर्थाने गाजवला.एकीकडे भारतीय जनता पक्षात त्यांनी आधी महाराष्ट्राचे, व नंतर, अखिल भारतीय अध्यक्षपद, त्यांनी भूषवले. त्यांच्या दोन वर्षाच्या छोट्या कार्यकाळात,  पक्षाला अधिक खोलवर रुजवण्यात, आणि शक्तिमान व गतिमान करण्यात, त्यांचे खुप भरीव योगदान आहे.

याच काळात, नितीनजींच्या प्रयत्नातुन,  प्रेरणेने, व मार्गदर्शनाखाली विदर्भात अनेक उद्योग खाजगी व सहकारी क्षेत्रात उभे राहिले. उद्योग उभे करतांना, नितीनजींनी, केवळ आर्थिक फायद्याचा विचार केला नाही. हे उद्योग, पथदर्शी कसे बनतील, ह्यातून विदर्भात उद्योगसंस्कृती कशी विकसित होईल, मोठ्या संख्येत रोजगार निर्मिती  कशी होईल, यातून शाश्वत व पर्यावरणपूरक विकास कसा होईल, याचा सतत पाठपुरावा केला. अग्रोवन सारखे नियमित वार्षिक उपक्रम, शेतकऱ्यांचे इजराइलचे अभ्यासदौरे, शेतकऱ्यांसाठी व युवकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, यातून, कृषिआधारित उद्योग, ही लोकचळवळ व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

२०१४ साल हे साल, नितीनजींसाठी अविस्मरणीय आहे. ज्या नागपुरबद्दल नेहमी म्हटलं जायचं कि, इथे भाजपा चा उमेदवार कधीच लोकसभा निवडणूक जिंकू शकणार नाही (आणि त्यातुन तथाकथित उच्चवर्णीय असल्यावर तर मुळीच नाही) तिथे गडकरी,प्रचंड बहुमताने निवडून आले. नुसते स्वत:च नाही, तर पक्षाच्या, विदर्भातील इतर सर्व उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
२०१४ मधे पहिल्यांदा स्वबळावर जेंव्हा भारतीय  जनता पक्षाचे सरकार आले, तेंव्हा, त्यांच्याकडे महामार्ग, रस्ते वाहतुक, जलवाहतुक, बंदरे विकास, गंगा शुद्धिकरण इतक्या मंत्रालयांची जबाबदारी असूनही त्यांनी सर्वच खात्यांना अगदी योग्य न्याय दिला. त्यांच्या कारकिर्दीत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम यांना जोडणारा  सुवर्ण चौरस या  महत्त्वाकांक्षी योजनेची नुसती कल्पनाच मांडली गेली नाही तर तो आता पूर्णत्वाला जायच्या अंतिम टप्प्यात आहे. गडकरींच्या काळात महामार्ग बांधणीचा वेग चौपट वाढला. आत्तापर्यंत दुर्लक्षित आणि दुर्गम असलेल्या लडाख, जम्मू-काश्मीर, पूर्वोत्तर भागात अनेक नवीन  महामार्गांच्या परियोजना मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्या. त्यामुळे व्यापार व पर्यटन वृद्धीतून आर्थिक विकासाला तर पाठबळ मिळालेच. पण त्याचबरोबर दहशतवाद निर्मूलन आणि सांस्कृतिक ऐक्यासाठी पोषक वातावरण तयार झालं. नितीनजींनी, जल वाहतुक, ही स्वस्त व प्रदूषणमुक्त असल्याचे हेरुन, आणि भारतासारख्या देशात प्रचंड वाव असल्याचे लक्षात  घेऊन प्रवासी व माल वाहतुकिसाठी अनेक योजना आखल्या.

गेल्या वर्षी जगाला आणि देशाला करोनाने त्रस्त केले. अगदी सुरवातीच्या काळात नितीनजींना पण त्याचा संसर्ग झाला. त्यातच त्यांची एंजियोप्लास्टी पण झाली.  पण त्यानी या सर्वांवरY सहज आणि लवकर मात करीत पुन्हा त्याच जिद्दीने आणि जोमाने कार्याला सुरवात केली. जेंव्हा करोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला, तेंव्हा नितीनजींनी पक्षाचा, राजकीय फायद्या-तोटयाचा विचार न करता   पायाभूत स्वास्थ्य सुविधा कशा उभ्या राहतील, आवश्यक औषधे व यंत्रसमुग्री कशा उपलब्ध होतील याच्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश पण छान आलं. राष्ट्रीय स्तरावर त्याची दखल पण घेतली गेली. काही मुख्य मंत्र्यांनी तर त्यांना सल्ला आणि मदत मागणं सुरु केलं. आत्तापर्यंत श्री नितीन गडकरी, लोकांना पूलकरी, रोडकरी म्हणून तर माहित होतेच.  पण आता निरोगकारी म्हणुन नवीन ओळख प्रस्थापित झाली.

अशा या नितीनजींचं, या निमित्ताने अभिष्टचिंतन आपण करु या. त्यांना आरोग्यसंपन्न, वैभवशाली, सतत नवीन यशोशिखरे पादक्रान्त करणारे, खूपखूप  दीर्घायुष्य मिळो म्हणून प्रार्थना करुया. तसेच आपल्या सर्वांच्या मनात, त्यांच्या बद्दल ज्या इच्छा-अपेक्षा आहेत, त्या सर्व पुऱ्या होतील ही श्रद्धा आणि विश्वास ठेऊ या.

नागपुर                    शुभांग गोरे
२७ में, २०२१

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार