महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि गोवा जोडणाऱ्या आगामी शक्तिपीठ एक्स्प्रेसवेसाठी भूमी अधिग्रहणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नवीन नागपूर - गोवा महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणार असून ८०० किमी लांबीचा असणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यातील जागृत देवस्थान या महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अशा मंदिरांना हा महामार्ग जोडण्यात येणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाचा उद्देश म्हणजे, पर्यटन क्षेत्रांचा विकास आणि या पर्यटनाला चालना देणे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ८६,००० कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. MSRDC ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन नागपूर - गोवा महामार्ग दोन्ही शहरात थेट कनेक्टिव्ही निर्माण करणार आहे. या महामार्गामुळं २१ तासांचा वेळ कमी होऊन ११ तासांवर होणार आहे. म्हणजेच नागपूरहून गोवा गाठणे आता ११ तासांत शक्य होणार आहे. या महामार्गाचे दुसरे वैशिष्ट्यै म्हणजे, हा माहामार्ग १२ जिल्ह्यातील देवस्थानांना जोडणार आहे. यात दोन ज्योतिर्लिंग आहेत. एक म्हणजे परळी वैजनाथ आणि दुसरे हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ (नागेश्वर) यांचा समावेश आहे.