सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जगाला सत्य व अहिंसेचा मार्ग दाखविणारे वर्धमान महावीर

भारत ही महापुरुषांची भूमी आहे. या भूमीत अनेक महापुरूषांनी मानवांना जीवनाचे सत्य आणि जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे.

Sudarshan MH
  • Apr 25 2021 11:28AM




भारत ही महापुरुषांची भूमी आहे. या भूमीत अनेक महापुरूषांनी मानवांना जीवनाचे सत्य आणि जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे. या महापुरुषांपैकी एक महापुरूष म्हणजे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर वर्धमान महावीर होय. ज्यांना भगवान महावीर म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्मदिन महावीर जयंती म्हणून उल्हासाने साजरा केला जातो.


मगध देशातील वैशाली नगरीचे उपनगर असलेल्या कुंडग्राममध्ये महावीरांचा जन्म झाला. त्यांचा जन्म क्षत्रिय राजघराण्यात झाला. वर्धमान महावीर यांचा काळ इ.स.पूर्व ५९९ ते इ.स.पूर्व ५२७ असा सांगितला जातो.  त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. विदेहदिन्ना व प्रियकर्णी या नावांनीही ती ओळखली जात असे. महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व प्रकारचे शिक्षण वर्धमान यांना मिळाले होते. त्यांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. त्यामुळे त्यांचे मन गृहस्थधर्मामध्ये रमले नाही. त्यांच्या या वैराग्यामुळे आई-वडिलांना चिंता वाटत होती. परंतु तुम्ही हयात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही असे वचन त्यांनी आई-वडिलांना दिले होते.  आई-वडिलांच्या निधनानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी राजवाड्याचे भव्य जीवन सोडले व ते अध्यात्मिक अभ्यासाच्या मार्गावर गेले. त्यांनी गृहत्याग केल्यानंतरची १२ वर्षे खडतर तपश्चर्या केली. आपल्या कठोर तपश्चर्येने सर्व इच्छा आणि विकारांवर त्यांनी मात केली. त्यानंतर ते वर्धमानाचे 'भगवान महावीर' या नावाने विख्यात झाले. ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले. अहिंसेच्या तत्वावर त्यांनी भर दिला.  वैदिक यज्ञयागातील हिंसा कालबाह्य झाली याचे प्रमुख कारण म्हणजे महावीर व गौतम बुद्ध यांनी हिंसेला केलेला विरोध होय. समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी महावीरांनी जातीव्यवस्थेवर हल्ला चढविला आणि सर्व जाती-जमातींच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे, तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले. सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा यासाठी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा त्यांनी वापर केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकहितासाठी वाहिले. समाजात प्रचलित असलेल्या वाईट प्रथा व अंधश्रद्धा दूर करण्यास हातभार लावला. जीवनाच्या अंतापर्यंत ते धर्मोपदेश करीत राहिले. प्रत्येकाने सत्य, अस्तेय, अहिंसा, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच व्रतांचे पालन करणे आवश्यक आहे असे सांगितले. अहिंसा हा परम धर्म आहे, अहिंसा जगाचा रक्षणकर्ता आहे व तोच मनुष्याचा खरा धर्म आहे आणि तेच मनुष्याचे कर्म आहे असा उपदेश त्यांनी केला. त्यांनी विस्तार केलेल्या जैन तत्त्वज्ञानात जीव आणि अजीव हे दोनच मुलपदार्थ म्हणून मानलेले आहेत. सृष्टीतील कोणताही पदार्थ या दोहोपैकी कोणत्याही एकाच्या सदरात अंतर्भूत करता येतो वा करावा लागतो असे त्यांचे जैन तत्त्वज्ञान सांगते. जैन तत्वज्ञानात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही तत्वे प्रमुख मानली आहे. कोणत्याही वा कोणाच्याही विचारांवर अन्याय न व्हावा आणि कोणत्याही प्राण्याची हिंसा न व्हावी, अर्थात सर्वांचे विचार समजून घ्यावे व सर्वांनी सर्वांच्या जिवनाची रक्षा करावी हे महाविरांच्या उपदेशाचे मूलतत्त्व आहे. हेच मूलतत्व समाजात समानता, बंधुता व मानवता रुजविते. म्हणूनच जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर "महावीराचे चरित्र म्हणजे साधू चरित्राचा प्रथम आदर्श होय" अशा शब्दात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाविरांचा गौरव केला आहे.

जगाला सत्य, अहिंसेचे महत्त्व पटवून देणाऱ्या वर्धमान महावीर यांचे आश्विन वद्य अमावस्येला मध्यरात्री राजगृहाजवळ पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. त्यांनी जगाला दिलेला सत्य, अस्तेय, अहिंसा, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या व्रतांच्या पालनाचा दिलेला संदेश अत्यंत मोलाचा आहे. 


निलेशकुमार रामभाऊजी इंगोले 
मोर्शी, जि.अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार