Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेत या संपूर्ण हल्ल्याची माहिती पुराव्यांसह दिली. ९ दहशतवादी तळ भारताने बेचिराख केले आहेत. भारतीय लष्कराने १ वाजून ५ मिनिटांनी हल्ल्याला सुरूवात केली. तर १ वाजून ३० मिनिटांनी भारतीय लष्कराने ही मोहीम फत्ते केली. बरोबर २५ मिनिटांत ही कारवाई भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली. आर्मीच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली.
१८ डिसेंबर २००४ रोजी भारतीय हवाई दलात नियुक्त झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांना सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडरपैकी एक मानल्या जातात. व्योमिका सिंग यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्तम अनुभव आहे. व्योमिका सिंग यांना अडीच हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव मिळाला आहे. व्योमिकाने ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या कठीण भागात चिता आणि चेतक सारखी हेलिकॉप्टर उडवली आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये, त्यांनी अरुणाचल प्रदेशात एक अतिशय कठीण मोहीम राबवली आणि जीव वाचवले. भारतीय हवाई दलाचा वैमानिक म्हणून धोकादायक भागात उड्डाण करण्याचा व्योमिका सिंग यांना चांगला अनुभव आहे.
ब्रीफिंग देताना विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, की गुप्तचर यंत्रणांच्या ठोस माहितीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथे लष्करच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी येथून प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद्यांचा कणा मोडण्यासाठी कारवाई करण्यात आली. बर्नाळा कॅम्प देखील पाडण्यात आला. सियालकोटमधील महमूना कॅम्प देखील उद्ध्वस्त झाला.
व्योमिका सिंह यांनी अनेक बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या ऑपरेशनल भूमिकेव्यतिरिक्त, विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सहनशक्ती मोहिमांमध्ये देखील भाग घेतला आहे. २०२१ मध्ये, त्यांनी २१,६५० फूट उंचीवर असलेल्या माउंट मणिरंगवरील त्रि-सेवांच्या सर्व-महिला गिर्यारोहण मोहिमेत सामील झाल्या होत्या. या प्रयत्नाची दखल हवाई दल प्रमुखांसह वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी घेतली.