नवी दिल्ली: जम्मू - काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई करतांना दिसत आहे. अशातचं आता देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून आवश्यक ती पावले सतत उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना नागरी संरक्षणासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे. कोणत्याही हल्ल्याच्या बाबतीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे, हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशातील सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर नागरिकांना धोका होऊ नये, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे ठरवले आहे. जेणेकरून युद्धजन्य परिस्थतीमध्ये सर्वसामान्य लोकांना स्वत:चे रक्षण करता येईल. विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य लोकांना स्वत:च्या रक्षणासोबतचं आपल्या परिसराचे संरक्षण करता यावे, यासाठी केंद्र सरकार प्रशिक्षण देणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मॉक ड्रिल दरम्यान कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल, यासंदर्भात माहिती समोर येत आहे.