सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युग निर्माता संत गाडगेबाबा

मानवतावादी दृष्टिकोनातून मार्गक्रमण करीत, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी विचारांच्या आधारे शोषितांच्या, दुःखीतांच्या तसेच तळागाळातील दीनदुबळ्या समूहाच्या वेदनेवर फुंकर घालणारे व आपल्या बुद्धिप्रामाण्यवादातून व कार्यातून समाजक्रांती घडविणारे थोर समाजसेवक म्हणजेच संत गाडगेबाबा.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
  • Dec 19 2020 10:12PM
संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापुर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. आईचे नाव सखुबाई होते. कर्जबाजारीपणा व व्यसनाधीनता यामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू होऊन वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे बालपणापासून दारिद्र्य, अज्ञानामुळे होणारी फसवणूक, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांनी जवळून अनुभवले होते व सहन केले होते. त्यांचे जीवन चक्र चालू असतांना त्यांच्या विचारांना या अनुभवातून प्रगल्भता आली होती. अशातच या समस्यांतून समाजाला मुक्त करण्याच्या भावनेतून सन १९०५ साली त्यांनी गृहत्याग करून समाज उद्धारासाठी पाऊल उचलले आणि त्यांच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरू झाले. गाडगेबाबांनी आपल्या जीवनात सावकारीचा पाश कसा गुंडाळतो याचा अनुभव घेतला होता. समाजाचाही अभ्यास त्यांना होता. सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा मनुष्यास कशा हतबल करतात याचाही कठोर अनुभव त्यांनी घेतला होता. त्यातच समाजामध्ये असलेली जातीयतेची दरी मनुष्याचे माणूसपण नाकारत होती. शिक्षण नसल्यामुळे सर्वसामान्यांची कशी फसवणूक होते हे त्यांनी पाहिले होते. रोगराईचे मूळ अस्वच्छतेत आहे, ही रोगराई दूर करण्याऐवजी लोक पशुहत्या करीत होते. हे बदलले पाहिजे असे त्यांना वाटत होते. हे सर्व बदलण्यासाठी खराटा रुपी शास्त्राचा अत्यंत चपलख वापर त्यांनी केला. तसेच किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली. दिवसा खराट्याने गाव स्वच्छ करणे व रात्री कीर्तनाने गावातील लोकांची मनेही स्वच्छ करणे हे कार्य त्यांनी नित्य सुरू केले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, मुक्या जनावरांची हत्या करू नका, मुला-मुलींना शिक्षण द्या असा उपदेश केला. गाडगेबाबांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती. कारण ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले महान समाजसुधारक होते. गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून दांभिकपणा, अनिष्ट रूढी, कालबाह्य अनिष्ठ परंपरा यावर टीका करून कीर्तनातील श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून अज्ञानाची जाणीव करून देत. त्यांचे उपदेशही अगदी साधे सोपे असत. चोरी करू नका, व्यसन करू नका, एक वेळ उपाशी रहा पण कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांना अभय द्या अशा प्रकारे ते सांगात. ते माणसातच देव पाहणारे संत होते. त्यांना मुर्तीपूजा मान्य नव्हती. देवासाठी कोंबडे, बकरे अशा मुक्या प्राण्यांचे बळी देणे त्यांना मान्य नव्हते. ते माणसातच देव पाहत होते. समाजातील अपंग, दिनदुबळ्या लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा असे ते मानत होते. समाजातील असत्याला वाचा फोडून सत्य सांगण्याचे धैर्य त्यांच्या अंगी होते. त्यांच्या अंगी प्रचंड आत्मविश्वास होता. शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना स्वच्छता आणि चरित्र यांची शिकवण ते देत. त्यांच्या विचारात शिक्षणाला अग्रस्थान होते. ते कठोर शब्दात म्हणत, "बापहो ! शिका ! ज्याले विद्या नाही, शिक्षण नाही त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. आता तरी सुधरा, इव्हायाले पाहुणचार करू नका, पण मुलाला शाळेत घातल्या बिगर सोडू नका. विद्या हे मोठं धन आहे." अशा शब्दात गाडगेबाबा तळागाळातील जनतेला सतत प्रबोधन करीत असत. गाडगेबाबांनी केलेल्या कार्यात आश्रमशाळा, शाळा, वसतिगृहे यांना प्रथम स्थान असल्याचे दिसून येते. त्यांचे शिक्षणाविषयी विचार पुस्तकी नव्हते. त्यांनी समाजाकडे जे डोळसपणे पाहिले म्हणजेच लोकव्यवहाराचे निरीक्षण केले आणि अनुभव घेतले त्यातून विकसित झालेले होते. महात्मा फुले यांनी शिक्षणाविषयी लोकजागृती करून प्रत्यक्षात शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. हेच कार्य गाडगेबाबांनी केले. म्हणूनच लोकशिक्षकाची भूमिका घेऊन खरे लोकशिक्षण घडविणारे संत गाडगेबाबा हे केवळ एक व्यक्ती नाही, तर ते समाज प्रबोधन करणारे लोक विद्यापीठ आहे. "महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ" असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांविषयी काढले आहेत. गाडगेबाबांचे व्यक्तिमत्त्व अलौकिक, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी होते. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाठबळ मिळाले. "जे का रंजले गांजले" म्हणणाऱ्या संत तुकारामांचा विचार संत गाडगेबाबांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. दिशाहीन समाजाला मार्ग दाखवण्यासाठी बाबांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच गाडगेबाबांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. स्वतःला शिक्षणाचा लेशही नसतांना ज्यांनी स्वतःच्या कार्याद्वारे समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखविला व रचनात्मक कार्यातून समाजासमोर महान आदर्श ठेवला असे महान कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन ! 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार