कराड जनता सहकारी बँकचा परवाना रद्द करण्याची घटना ताजी असताना आता कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेनं रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेने सुभद्रा बँकेवर गेल्या दोन महिन्यांपासून व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता धडक कारवाई केली आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेवर महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली होती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण 13 शाखा आहेत. 100 कोटीपर्यंत ठेवी पोहचल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षात अनेकांनी ठेवी काढून घेतल्या. सध्या बँकेत एकूण 40 ते 50 कर्मचारीच काम करत आहेत. 2003 च्या सुमारास उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं कारवाई करत ठेवीदारांचे पैसे परत देता येईल इतकी मालमत्ता असल्याची माहिती पत्रात दिली आहे
याच महिन्यात 9 डिसेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला होता. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला होता