सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एक अनुभव असाही - सुरेंद्र शिवदे

संपुर्ण भारतात कोवीड-19 साथरोगाच्या अनुषंगाने लाॅकडाऊन आदेश जारी करण्यात आला. त्या दिवसापासून मी सुरेंद्र शिवदे आणि जिल्हा विशेष शाखा पालघर चे सर्व अधिकारी/कर्मचारी कोवीड-19 च्या कामात जुंपले गेलो

मनीष गुप्ता
  • Jun 12 2020 12:06PM
पालघर -  दि.23/03/2020 रोजी संपुर्ण भारतात कोवीड-19 साथरोगाच्या अनुषंगाने लाॅकडाऊन आदेश जारी करण्यात आला. त्या दिवसापासून मी सुरेंद्र शिवदे आणि जिल्हा विशेष शाखा पालघर चे सर्व अधिकारी/कर्मचारी कोवीड-19 च्या कामात जुंपले गेलो. दोन चार दिवस जात नाहीत तोच पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीसांच्या वैद्यकिय रजा वगळून सर्व सुट्ट्या बंद करण्यात आल्या. अगदी साप्ताहिक सुट्ट्याही बंद करण्यात आल्या. कोवीड-19 च्या रूग्णांची आणि त्या मुळे होणा-या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत चालली होती. पोलीस अहोरात्र काम करत होते. लाॅकडाऊन संपुन सुट्ट्या चालू होण्याची आशा हळू हळू मावळायला लागली होती. त्यातच दि. 16/04/2020  कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधू हत्याकांड घडले आणि पोलीसांच्या हालअपेष्ठांना पारावार उरला नाही. फक्त ड्युटी दिसत होती पोलीसांना. ते आपले कुटूंब घरदार सर्वच विसरले होते. कोवीड-19 पेक्षा गैरहजर लागण्याची भिती वाटायला लागली होती. सर्व वाहने बंद, रेल्वे बंद मग घरी जाणार तरी कसे? हॉटेल्स, ढाबे बंद साधा वडापावही मिळेनासा झाला. पोलीस खाजगीत तक्रार करत होते पण समोर येऊन तक्रार करण्याची हिंमत नाही झाली कोणाची. कासा प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करू लागले. स्वतः पोलीस अधीक्षक श्री गौरव सिंग जातीने नेतृत्व करत होते. पोलीसांच्या शोध पथकावरही आरोपींनी हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न  केल्याने पोलीसांना स्वसंरक्षणासाठी फायरींगही करावी लागली. आरोपी जंगलाची चांगली जाण असलेले होते त्यामुळे ते जंगलात पळून जात होते किंवा गडावर चढून जात होते. पाठशिवणीचा खेळ चालू होता. अखेर 100 च्या वर आरोपींची धरपकड करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी अटक केले खरे पण इथून पुढे पोलीसांच्या क्षमतेचा खरा कस लागणार होता. लाॅकडाऊन व कोवीड-19 मुळे नविन आरोपींना जेल प्रशासन जेलमध्ये घेत नव्हते. पालघर जिल्ह्याला स्वतंत्र जेल नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने आरोपींना पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या लाॅकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यांचेवर गार्ड साठी अतिरिक्त पोलीस लावण्यात आले.  

परीक्षेची घडी 

आरोपी वेगवेगळ्या लाॅकअपमध्ये ठेऊन जुगाड तर केला पण पोलीसांपुढे किती मोठं संकट वाढून ठेवलेले होते याची जाणीव त्याक्षणी झाली नाही. पण संकटाचा तो दिवस उजाडला. धस्स झालं. अटक आरोपींपैकी वाडा लाॅकअपमधील एक आरोपी कोवीड-19 पाॅझीटीव्ह निघाला आणि सर्वांचे ढाबे दणाणले. अर्ध्याच्यावर  पोलीस ठाणे क्वाॅरंटाईन झाले. मग तर सिलसिलाच चालू झाला कोवीड-19 पाॅझीटीव्हचा. डहाणू लाॅकअप आरोपी आणि सहा पोलीस पाॅझीटीव्ह. कासा लाॅकडाऊन आरोपी आणि दोन पोलीस पाॅझीटीव्ह. विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणचे 11 पोलीस पाॅझीटीव्ह, वालीव पोलीस ठाण्याचे 3, तुळींज 2, मुख्यालय 4, नियंत्रण कक्ष 2 पाॅझीटीव्ह झाले आणि उपचारासाठी जिल्ह्यातील विविध हाॅस्पीटल्समध्ये दाखल झाले. पाॅझीटीव्ह/क्वाॅरंटाईनचा खेळ चालू झाला. जिल्हाभरात 37 पोलीस अधिकारी/कर्मचारी कोवीड-19 पाॅझीटीव्ह झालेत. क्वाॅरंटाईन आणि होम क्वाॅरंटाईन चा सिलसिला चालूच होता. माझ्यासोबत यापूर्वी काम केलेले माझे अनेक सहकारी पाॅझीटीव्ह झाले. 

कुठे  आम्हाला कोरोना वाॅरीयर म्हणून मोटीवेट केलं जातं होतं तर कुठे लाॅकडाऊनचा उल्लंघन केलेल्या राजकिय कार्यकर्त्यावर बळाचा वापर केला म्हणून आमच्या एका पोलीस निरीक्षकाला कंट्रोलला जमा केलं जातं होतं. पोलीस मार खात होते. 15 च्यावर 353 चे गुन्हे दाखल झालेत.  अशातच कासा कांडांचा ठपका ठेऊन पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठविण्यात आलं  आणि नंतर त्यांची बदली करण्यात आली. जिल्हा अनाथ झाला 

मोरल हाय करणे गरजेचं होत पालघर पोलीस दलाचे. अनुभवी अशा श्री दत्तात्रय शिंदे (IPS) यांची वर्णी लागली. आल्या आल्या त्यांनी काॅलऑन सारख्या पद्धतीला फाटा देऊन कामाचा धडाका चालू केला. आधी कोवीड सेल ला मजबूत दिली. कोवीड सेलचे पोलीस निरीक्षक जितेंद्र  वनकोटी यांच्यावर विश्वास दाखवून आधी पोलीसांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा कशा पुरवता येतील याचा आढावा घेतला. नेतृत्वहिन पालघर पोलीस दलाचे काम उच्च पातळीवर नेण्याचे आव्हान नविन नेतृत्वाने स्विकारले. रात्रंदिवस काम आधी पोलीसांसाठी कोवीड -19 हाॅस्पीटल( DCHC) मग तात्पुरते जेल असे महत्वाचे विषय त्यांनी हाती घेतले. जिल्हाधिकारी श्री शिंदे साहेब आणि पोलीस अधीक्षक श्री शिंदे साहेब यांची युती झाली. दोन समविचारी लोक एकत्र आल्यावर काय होते याचे त्यांनी उदाहरणच घालून दिले. अवघ्या चार दिवसात वाडा येथे पोलीसांसाठी हाॅस्पीटल आणि विक्रमगड व पालघर येथे जेल मंजूर झाले. बरं पालघर मध्ये तर कोवीड-19 पाॅझीटीव्ह आरोपींची उपचाराचीही सोय करण्यात आली. दोन प्रश्न तर मार्गी लागले परंतू कोवीड-19 चा पोलीसांना बाधित करण्याचा एक कलमी उपक्रम चालूच होता.

काळा दिवस

पोलीस हवालदार किरण किसन साळुंखे वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला आणि सर्वांचा आवडता असा कर्मचारी. दि.29/05/2020 दि.30/05/2020  असा सलग दोन दिवस आरोपी हजर करण्यासाठी वसई कोर्टात गेला. दि.01/06/2020 रोजी ताप आल्याने तो भाइंदर टेंभा येथील पं.भीमसेन जोशी शासकीय रूग्णालयात दाखल झाला. डाॅक्टरांना शंका आली म्हणून त्याची कोवीड-19 चाचणी करण्यात आली. दरम्यान त्याची तब्येत जास्तच खालावल्याने त्याला दि.03/06/2020 रोजी रिद्धिविनायक हाॅस्पीटल, नालासोपारा (प)  येथे दाखल करण्यात आले.अखेर डाॅक्टरांची शंका खरी ठरली. दि.05/06/2020 रोजी तो कोवीड-19 पाॅझीटीव्ह असल्याच निदान झालं. सतत व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. या कोरोना वाॅरीयरची कोरोना राक्षसाशी चालू असलेली झुंज त्याच्या मृत्युने संपवली. उपचारादरम्यान तो दि.09/06/2020 रोजी शहिद झाला. संपुर्ण पालघर पोलीस दलावर शोककळा पसरली. आमचा कोरोना वाॅरीयर शहिद झाला. सन 2013 ते सन 2015 मध्ये सोबत काम केलेले असल्याने मन सुन्न झालं. साहेब बिनसाखरेचा शिवदे चहा सांगून ठेवतो असं तो पुन्हा बोलणार नाही. काळीज चराचरा कापल गेलं. 15/20 दिवसांपूर्वी पेल्हार चौकीवर चहा पिण्यासाठी थांबवले त्याने त्यावेळेस गप्पा गोष्टी झाल्या. मी म्हटल अरे किरण तू घे ना चहा तेव्हा तो बोलला की शुगर झालीय साहेब नको चहा आता. मी बोललो त्याला काळजी घे आणि निघालो. त्याच्या शहिद होण्याचं दुखः तर होतं पण त्याची 35 वर्षाची पत्नी 6 आणि 8 वर्षाची दोन मुल डोळ्यासमोरून जाईनात. पोलीस अधीक्षकांनी त्याच्या  कुटूंबियांना रू.50,00,000/- मदतीचा प्रस्ताव तात्काळ बनवायला सांगीतले. मी आणि पोलीस निरीक्षक वनकोटी प्रस्ताव बनवत असतांना महिला पोलीस निरीक्षक राणी पुरी यांचा फोन आला. त्या किरण बद्दल बोलत होत्या रात्रीचे 10 साडेदहा झाले असतील. दिवस भर ऑफीसला सहकारी होते म्हणून व्यक्त होता आलं नाही पण पुरी मॅडमचा फोन आला आणि अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर चार/पाच मिनीट आम्ही दोघे फक्त रडत होतो. आमच्या दोघांचेही 50% पंचनामे किरणच्या हस्ताक्षरातील असतील. एक हरहुन्नरी सहकारी आम्ही गमावला होता. जड अंतःकरणाने घरी आलो. रात्रभर झोप लागली नाही. फक्त कुस बदलत राहीलो. पहाटे डोळा लागला.

पुन्हा परिक्षा

ऑफीसला आलो ते सुजलेले डोळे, थकलेला चेहरा घेऊन. आल्या आल्या कळालं की आमच्यासोबत काम करणारा छोटा गजू कोविड-19 पाॅझीटीव्ह निघाला. पुन्हा धस्स झालं. मी, पोनि वनकोटी आणि इतर पाच सहकारी हायरिस्क मध्ये होतो. आम्हाला क्वाॅरंटाईन केलं गेलं. दि.10/06/2020 रोजी आमचे स्वॅब घेण्यात आले. टेंशन-टेंशन-टेंशन आणि फक्त टेंशन चाललं झालं.

निकालाची घडी

रिपोर्ट 11 किंवा 12 तारखेला मिळणार होते. रात्र काढायची कशी ?? दहा वेळा पोनि वनकोटी यांना फोन करणं/घेणं,  इतरांना फोन करणं घेणं चालू होतं. सर्वजण एकमेकांना धीर देत होते. पोनि सुधीर संखे यांना फोन केला. ते म्हणाले देव आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका.  मी निगेटीव्ह थाॅटवाला त्या मुळे मी पाॅझीटीव्ह विचार करत नव्हतो म्हणजे मी पाॅझीटीव्ह येणार असं मनोमन वाटतं होतं. रात्रीची घड्याळाची टिकटिक असह्य होत होती. उठलो आणि घड्याळाची बॅटरी काढली. पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी घड्याळ बंद झालं. परत नाही नाही ते विचार यायला लागले. भाऊ आणि जवळच्या मित्रांना फोन करून मला क्वाॅरंटाईन केल्याचं सांगीतलं. सर्वांनी तुला काही होणार नाही असा धिर दिला. त्या तंद्रीत झोप कधी लागली ते कळालं नाही. 

दि.11/06/2020 रोजी सकाळी 10 च्या दरम्यान जाग आली. अंथरुणात पडल्या पडल्या उसणं अवसान आणून टिममधले मोठा गजू, मंगेश आणि रूपालीला फोन केला. त्यांना कामाबद्दल विचारलं. काही अडचण आली तर मला फोन करा सांगीतलं. प्रत्यक्षात टरकली होती हे त्यांना कसं सांगणार?   परीक्षेची घडी जवळ येत होती. मी माझ्यासोबत क्वाॅरंटाईन केलेल्या सपोनि रविंद्र नरोटे यांना फोन केले. भावाने फोन उचलले नाहीत अजून टेंशन वाढले. काय झालं असेल ?? विचारांची टकळी फिरू लागली. तेवढ्यात पोनि वनकोटी यांचा फोन आला. मी विचारलं काय झालं? ते बोलले पाॅझीटीव्ह. धक्का धक्का धक्का. मी पुन्हा पुन्हा विचारलं हो म्हणाले. म्हणजे मी पण कन्फर्म पाॅझीटीव्हच असणार. मेट्रोपोलीस कडून आलेला मेल बघण्याच धाडस होईना. तसाच बसलो. सात/आठ मिनिटांनी पोनि वनकोटी यांचा फोन आला. मी फोन उचलला नाही. पुन्हा त्यांनी फोन केल्यावर फोन उचलून कानाला लावला पण काही बोललो नाही. त्यांनी विचारलं रिपोर्ट पाहीला का ? मी त्यांना सांगीतलं बाॅस हिंमत नाही झाली. ते हसायला लागले. मी म्हटलं येडा आहे का हा माणूस कोवीड-19 पाॅझीटीव्ह झालाय आणि हसतोय. मी नर्वस झालो. ते बोलले मी फिरकी घेतली. निगेटिव्ह आहे रिपोर्ट. आता मात्र भयंकर राग आला मला या माणसाचा. पटकन मेल बाॅक्स उघडला आणि  देवाचं नाव घेऊन मेट्रोपोलीसचा मेल उघडला तर तो पासवर्ड प्रोटेक्टेड. म्हणजे पाॅझीटीव्हच असणार अस मनोमन वाटलं. तेवढ्यात रस्त्यावर ॲम्ब्युलन्स चा आवाज आला. मला वाटलं की मला घ्यायला आलेत कारण मेट्रोपोलीस थेट प्रशासनाशी कनेक्टेड आहे. धाकधूक वाढली. मेल वाचला त्यात पासवर्ड होता. पासवर्ड टाकून फाईल उघडली पण डोळे बंद करून देवाचा धावा केला आणि डोळे उघडले.  नाॅट डिटेक्टेड हा शब्द वाचला आणि जीव भांड्यात पडला. बच गया बाॅस. खर म्हणजे भिती पाॅझीटीव्ह येण्याची नव्हती तर हाॅस्पीटलमध्ये ॲडमीट होण्याची होती. आता उद्या पासून नव्या उमेदीने आणि उभारीने कर्तव्यावर हजर होणार कारण देश आधी.

किरण आणि त्याच्या एक दिवस आधी सेवानिवृत्त पोउनि प्रकाश सावंत यांना कोवीड-19 ने आमच्यातुन नेले. परंतू ते आमच्या ह्रदयात सदैव अमर राहतील. 

मी कोवीड-19 ला हुलकावणी जरी दिली असली तरी टेंशन काय असतं त्याचा अनुभव मात्र घेतला. माझी सर्व पोलीस बांधवांना विनंती आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि जनतेला आवाहन करतो की पोलीसांना सहकार्य करा, मदत करा. या दोन दिवसात ज्यांनी मला मोरल सपोर्ट दिला त्यासाठी मी त्यांचा आयुष्यभर आभारी राहीन.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार