सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी
नंदुरबार: जिन्यातील कोपऱ्यात देवी-देवतांच्या टाईल्स लावून पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी येथील हिंदु सेवा सहाय्य समितीने तक्रार केली होती. त्यानंतर तात्काळ संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाने जिल्ह्यातील देवतांच्या टाइल्स काढून हिंदू देवतांचा अवमान थांबवला.
याविषयी अधिक माहिती अशी की, येथील हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत हे दि. ५ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या मित्राच्या मुलाच्या शस्त्रक्रियेनिमित्त पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्या हॉस्पिटलमध्ये स्वागत कक्षाशेजारून जाणाऱ्या जिन्यात पहिल्या वळणावर कोपऱ्यात अगदी खाली भगवान शिवशंकर यांची तर दुसऱ्या वळणावर हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचे चित्र असलेली टाईल लावलेली त्यांना दिसून आली. या स्वरुपात हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केला जात असल्याचे आढळले. म्हणून हिंदू सेवाा सहाय्य समितीने तत्काळ दखल घेत हरकत घेतली.
दि. ७ जानेवारी रोजी त्या हॉस्पिटलला मेलद्वारे पत्र देण्यात आले. तक्रारीत म्हटले आहे की, हिंदू धर्मीय आपल्या देवी- देवतांची फोटो/ चित्र भक्तिभावपूर्वक देवघरात किंवा आपल्या वास्तूच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावत असतात. असे असतांना आपल्या हॉस्पिटलमध्ये अश्या वेगळ्या ठिकाणी ( कोपऱ्यात ) लावण्याचा हेतू लक्षात आला नाही. एकंदरीत असे लक्षात येते की, येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांनी त्या कोपऱ्यात थुंकू नये यासाठी देवतांची चित्र असलेली टाइल्स लावलेली आहे. आपण जाणून बुजून हिंदु देवतांचा अपमान करण्याच्या हेतूने सदर कृत्य केले आहे. २० जानेवारी पर्यंत कोपऱ्यात लावलेल्या देवतांच्या टाईल्स हॉस्पिटलने आदर पूर्वक काढून टाकाव्यात. अन्यथा हॉस्पिटल मॅनेजमेंटवर धार्मिक भावना दुखावल्याचा २९५- अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले होते. त्या नामांकित हॉस्पिटलने या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. हिंदु सेवा सहाय्य समितीला २० जानेवारी रोजी इ मेलने पत्रोत्तर देखील पाठवले. त्यात म्हटले आहे की, आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये जिन्याच्या कोपऱ्यात लावलेल्या देवतांच्या टाईल्स बाबत आम्हास अवगत केले. या टाईल्स खरेतर लोकांनी स्वच्छता राखावी या हेतूने लावलेल्या होत्या. कोठल्याही हिंदू देव देवतांचा अपमान करण्याचा हेतू यात नाही. आपण केलेल्या सूचनेची योग्य दखल घेऊन आम्ही त्या टाईल्स काढल्या आहेत.