विवेकानंद यांचे शिक्षणविषयक तत्वज्ञान
विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार खूप महत्वपूर्ण व दिशादर्शक आहेत. स्वामी विवेकानंद यांचा त्यावेळच्या मेकाॅलेप्रणीत इंग्रजी शिक्षण पद्धतीला विरोध होता. कारण या शिक्षणाचा उद्देश फक्त नोकर वर्गाची संख्या वाढविणे हा होता.
निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ होते. त्यांच्यावर बालवयात आईकडून धार्मिक तर मोठे झाल्यावर वडिलांकडून बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. महाविद्यालयीन जीवनात जगाचा इतिहास आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला. मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथाचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांच्यावर सर्वात अधिक परिणाम झाला तो केशवचंद्र सेन आणि विश्वनाथ शास्त्री यांच्या ब्राम्हो समाजाचा. मूर्तिपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तिथूनच त्यांनी उचलले. अनेक धर्मांचा तात्विक अभ्यास करून अमेरिकेत जाऊन शिकागो इथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि १७ दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वात अधिक प्रभाव त्यांचा पडला. बुद्ध आणि ख्रिस्त यांच्याशी त्यांची तुलना झाली. त्यांनी जगभरात अनेक व्याख्याने दिली. विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार खूप महत्वपूर्ण व दिशादर्शक आहेत. स्वामी विवेकानंद यांचा त्यावेळच्या मेकाॅलेप्रणीत इंग्रजी शिक्षण पद्धतीला विरोध होता. कारण या शिक्षणाचा उद्देश फक्त नोकर वर्गाची संख्या वाढविणे हा होता. त्यांना असे शिक्षण हवे होते जेणेकरून मुलाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. मुलांच्या शिक्षणाचे उद्दीष्ट त्याला आत्मनिर्भर बनविणे आणि त्याच्या पायावर उभे करणे हे असावे असे त्यांचे मत होते. स्वामी विवेकानंद यांनी प्रचलित शिक्षणाला 'निषिद्ध शिक्षण' असे संबोधले होते आणि म्हटले की, "तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करता ज्याने काही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि तो चांगले भाषण देऊ शकतो, परंतु वास्तविकता अशी आहे की शिक्षण हा सर्वसामान्यांसाठी संघर्ष आहे. कोणी तयारी करीत नाही, कोणी चरित्र निर्माण करीत नाही, समाजसेवेची भावना कोणामध्ये विकसित होत नाही आणि जो सिंहासारखा धैर्य जोपासू शकत नाही, अशा शिक्षणाचा काय फायदा ?" अशी शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती. त्यांच्या मते, शिक्षणाद्वारे धर्मनिरपेक्ष आणि इतर जागतिक जीवनाची तयारी झाली पाहिजे. धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून शिक्षणाबद्दल ते म्हणतात की, "आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे, जे चरित्र बनवते, मनाची शक्ती वाढवते, बुद्धीचा विकास करते आणि व्यक्तीला स्वतंत्र बनवते." ऐहिक दृष्टिकोनातून शिक्षणाविषयी ते म्हणाले की, "शिक्षण ही मनुष्याच्या अंतर्निहित परिपूर्णतेची अभिव्यक्ती आहे." स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण तत्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या विचारांतून शिक्षण असे असावे की, मुलांचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होऊ शकेल. ज्यातून मुलाचे चारित्र्य तयार होते, मन विकसित होते, बुद्धी विकसित होते आणि मुल स्वावलंबी होते अशा प्रकारे शिक्षण दिले पाहिजे. समाजातील सर्व मुला-मुलींनाही समान शिक्षण दिले पाहिजे. धार्मिक शिक्षण पुस्तकांऐवजी प्रत्यक्ष आचरण आणि कर्मातून दिले पाहिजे. लौकिक व इतर जगातील विषयांना अभ्यासक्रमात स्थान दिले पाहिजे. त्यामुळे वैश्विक पातळीवर शिक्षणाचा संबंध जोडला जाईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते शक्य तितके जवळचे असावे. शिक्षणाच्या प्रसिद्धीस प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सामान्य लोकांमध्ये ते पसरले पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. मानवी व राष्ट्रीय शिक्षण कुटुंबातून सुरू झाले पाहिजे. अशी शिक्षणाविषयी त्यांची भूमिका होती. शिक्षण हे राष्ट्राच्या नागरिकांना प्रतिभासंपन्न, शिस्तप्रिय, चारित्र्यवान व जबाबदार नागरिक घडविण्याचे महत्वपूर्ण माध्यम म्हणून त्यांनी शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. आयुष्यभर त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. स्वतःच्या आयुष्यातही त्यांनी या मूल्यांचे पालन केले. आयुष्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी आपली 'ध्यान' करण्याची पद्धत बदलली नाही आणि सकाळी दोन ते तीन तास ध्यान केले. ४ जुलै, १९०२ रोजी बेलूरच्या रामकृष्ण मठात, महासमाधी परिधान करून, ध्यानमय अवस्थेत त्यांचे निधन झाले. त्यांच्या अनुयायांनी तेथे त्यांच्या स्मृतीत मंदिर बांधले आणि जगभरात विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या संदेशांचा प्रसार करण्यासाठी केंद्रे स्थापन केली. बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा विवेकानंदा इतका उत्कृष्ट समन्वय दुसरा कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानव संस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखवता येत नाही. त्यांचे हे प्रभावशाली विचार तरुण वर्गासाठी अतिशय प्रेरणादायी व जीवनाचा मार्ग दाखविणारे आहेत. स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच त्यांचा जन्मदिन युवकदिन म्हणून साजरा केला जातो.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प