सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद

त्यांनी आपल्या विचार व कार्यातून देशाला घडविण्यासाठी युवकांना दिलेली प्रेरणा अद्वितीय आहे. म्हणूनच ते युवकांचे प्रेरणास्थान ठरतात. देशातील युवाशक्तीला प्रेरणा देण्यासाठी त्यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

Snehal Joshi .PR
  • Jan 12 2022 10:20AM

भा* रत देश हा नररत्नांची खान आहे. या देशात होऊन गेलेल्या थोर पुरुषांनी, विचारवंतांनी आपल्या प्रतिभेने भारतासमोर जगाला नतमस्तक केले आहे. अशा थोर विचारवंतापैकी एक महान विचारवंत, तत्वज्ञानी, समाजसुधारक म्हणजे स्वामी विवेकानंद होय. १९ व्या शतकात बंगालमध्ये होउन गेलेले ते एक जगविख्यात सन्यांशी होय. त्यांनी आपल्या वैश्विक एकतेच्या विचारातून सर्व मानवजातीला बंधूतेचा, मानवतेचा संदेश देऊन जगात सुख, शांती नांदण्यासाठी महान कार्य केले. त्यांनी आपल्या विचार व कार्यातून देशाला घडविण्यासाठी युवकांना दिलेली प्रेरणा अद्वितीय आहे. म्हणूनच ते युवकांचे प्रेरणास्थान ठरतात. देशातील युवाशक्तीला प्रेरणा देण्यासाठी त्यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांच्यावर बालवयात आईकडून धार्मिक तर मोठे झाल्यावर वडिलाकडून बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले.

महाविद्यालयीन जीवनात जगाचा इतिहास आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला. मिल आणि स्पेन्सर यांच्या ग्रंथाचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झाला होता. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमुळे देशभक्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांच्यावर सर्वात अधिक परिणाम झाला तो केशवचंद्र सेन आणि विश्वनाथ शास्त्री यांच्या ब्राम्हो समाजाचा. मूर्तिपूजेला विरोध आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व हे विचार तिथूनच त्यांनी उचलले. अनेक धर्माचा तात्विक अभ्यास करून अमेरिकेत जाऊन शिकागो इथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि १७ दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वात अधिक प्रभाव त्यांचा पडला. बुद्ध आणि ख्रिस्त यांच्याशी त्यांची तुलना झाली. त्यांनी जगभरात अनेक व्याख्याने दिली. त्यांचे हे महान कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षणातून सर्वांगीण विकास साधणारे विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार खूप महत्वपूर्ण व दिशादर्शक आहेत. युवक हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत म्हणून बालपणापासूनच त्यांना शिक्षणातून घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांच्या उज्वल भविष्यासाठी स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. त्यांना असे शिक्षण हवे होते जेणेकरून मुलाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास होईल. याच कौशल्याने देशाचा विकास घडेल. मुलांच्या शिक्षणाचे उद्दीष्ट त्याला आत्मनिर्भर बनविणे आणि त्याच्या पायावर उभे करणे हे असावे असे त्यांचे मत होते. या विचारांची आज खरी गरज आहे. कारण आज स्पर्धेच्या युगात स्वतःला सिध्द करूनच यश मिळवावे लागते. स्वामी विवेकानंद यांनी प्रचलित शिक्षणाला 'निषिद्ध शिक्षण' असे संबोधले होते आणि म्हटले की, "तुम्ही अशा व्यक्तीचा विचार करता ज्याने काही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत आणि तो चांगले भाषण देऊ शकतो, परंतु वास्तविकता अशी आहे की, शिक्षण हा सर्वसामान्यांसाठी संघर्ष आहे. कोणी तयारी करीत नाही, कोणी चरित्र निर्माण करीत नाही, समाजसेवेची भावना कोणामध्ये विकसित होत नाही आणि जो सिंहासारखा धैर्य जोपासू शकत नाही, अशा शिक्षणाचा काय फायदा?" अशी शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती. स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण तत्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्या विचारांतून शिक्षण असे असावे की, मुलांचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास होऊ शकेल. ज्यातून मुलाचे चारित्र्य तयार होते, मन विकसित होते, बुद्धी विकसित होते आणि मुल स्वावलंबी होते अशा प्रकारे शिक्षण दिले पाहिजे.

समाजातील सर्व मुला-मुलींनाही समान शिक्षण दिले पाहिजे. लौकिक व इतर जगातील विषयांना अभ्यासक्रमात स्थान दिले पाहिजे. त्यामुळे वैश्विक पातळीवर शिक्षणाचा संबंध जोडला जाईल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते शक्य तितके जवळचे असावे. शिक्षणाच्या प्रसिद्धीस प्रोत्साहन दिले पाहिजे आणि सामान्य लोकांमध्ये ते पसरले पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. मानवी व राष्ट्रीय शिक्षण कुटुंबातून सुरू झाले पाहिजे. त्यातूनच उद्याचा देशाचा रक्षक प्रतिभाशाली युवक तयार होईल ही त्यांची कल्पना होती. अशी शिक्षणाविषयी त्यांची भूमिका होती. आज आधुनिक काळात शिक्षणाची परिभाषा बदलत आहे. काळानुरूप शिक्षणाबरोबरच युवकांतील कौशल्यांचा विकास व त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराची संधी उपलब्ध असणे गरजेचे आहे. आज अनेक युवक बेरोजगार आहेत. भविष्यातही ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीकोनातून शिक्षणाची वाटचाल होणे गरजेचे आहे. तरच देशाची युवाशक्ती आत्मनिर्भर होईल व देशाच्या राष्ट्रबांधणीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असेल. याच दृष्टीकोनातून शिक्षण हे राष्ट्राच्या नागरिकांना प्रतिभासंपन्न, शिस्तप्रिय, चारित्र्यवान व जबाबदार नागरिक घडविण्याचे महत्वपूर्ण माध्यम म्हणून विवेकानंदांनी शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला. आयुष्यभर त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. स्वतःच्या आयुष्यातही त्यांनी या मूल्यांचे पालन केले. आयुष्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी आपली 'ध्यान' करण्याची पद्धत बदलली नाही आणि सकाळी दोन ते तीन तास ध्यान केले. ४ जुलै, १९०२ रोजी बेलूरच्या रामकृष्ण मठात, महासमाधी परिधान करून, ध्यानमय अवस्थेत या थोर पुरुषाचे निधन झाले.

बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा विवेकानंदा इतका उत्कृष्ट समन्वय दुसरा कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानव संस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखवता येत नाही. त्यांचे हे प्रभावशाली विचार युवक वर्गासाठी अतिशय प्रेरणादायी व जीवनाचा मार्ग दाखविणारे आहेत.

डॉ. निलेशकुमार रामभाऊजी इंगोले
शिरजगाव कसबा, जि.अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार