सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय मतदार दिन : मतदारांना कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी भारतभर साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीय मतदारांसाठी, नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

निलेशकुमार इंगोले
  • Jan 25 2021 5:04PM

राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी भारतभर साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीय मतदारांसाठी, नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ घ्यावी. कारण भारतातील प्रत्येक मतदाराचे मत देशाच्या भविष्याचा पाया घालते. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे मत राष्ट्रनिर्मितीत अमूल्य आहे. जगातील भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही मध्ये मतदानासंदर्भात घसरणारा कल पाहता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.

भारतात होणारी प्रत्येक निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाची घसरणारी शेकडेवारी यामुळे निवडणुकीत लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने सन २०११ पासून भारत सरकारने भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन २५ जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिन" म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. देशाच्या राजकीय प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व मतदारांना आपल्या मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी शासनाकडून व विविध सामाजिक संस्थांकडून या दिवशी मतदार जनजागृती साठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मतदार जनजागृती रॅली काढली जाते. त्यातून नागरिकांना राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली जाते.

देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे खरे प्रतिनिधित्व देशापुढे येईल. कारण अनेकांनी मतदान न केल्यामुळे त्यांचा देशाला मिळालेला प्रतीनिधित्वाबद्दलचा कल लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे मतदारांचे केवळ एक मत सुद्धा प्रतिनिधित्व बदलू शकते. म्हणून देशाचा कारभार सांभाळणारे प्रतिनिधित्व निवडतांना योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी भारतातील प्रत्येक मतदाराने मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे निकडीचे आहे. भारतीय संविधानाने मतदारांना दिलेला मतदानाचा हक्क खुप अनमोल आहे.

त्यामुळे आपल्या मतदानाचा हक्क सुज्ञपणे वापरून देशाला विकासाच्या मार्गावर वर घेऊन जाण्यासाठी आणि देशाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक मतदारांनी जागृत झाले पाहिजे. देशाच्या मतदारांच्या एकूण संख्येत तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरुणांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिकाधिक सहभागी होऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या मूल्यांना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

त्यातूनच भारताची लोकशाही अखंड राहील. मतदान प्रक्रियेत मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवणे, तसेच देशासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांना मतदानाबद्दल जागृत करणे हे राष्ट्रीय मतदार दिनाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी तसेच देशात निष्पक्ष निवडणुका घडवून आणून भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे ही महत्त्वपूर्ण योगदान आहे. आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने देशातील प्रत्येक मतदाराने आपल्या सक्रीय सहभागाच्या आधारे व आपली सांविधानिक जबाबदारी पार पाडून लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न संकल्प केला पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो."  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार