सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रेष्ठ मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी हे एक नामवंत लेखक, श्रेष्ठ मराठी नाटककार आणि प्रसिद्ध कवी आहेत.

Senhal Joshi MH
  • May 26 2021 11:00AM


राम गणेश गडकरी हे एक नामवंत लेखक, श्रेष्ठ मराठी नाटककार आणि प्रसिद्ध कवी आहेत. त्यांनी 'गोविंदाग्रज' या नावाने कविता लेखन, तर 'बाळकराम' या नावाने विनोदी लेखन केले. मराठी साहित्यक्षेत्रात राम गणेश गडकरी यांचे मोलाचे योगदान आहे.

राम गणेश गडकरी यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील गणदेवी येथे झाला. बालपणापासूनच साहित्यात विलक्षण रुची असल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच 'मित्रप्रिती' नावाचे नाटक लिहून त्यांनी आपले लेखन सुरू केले होते. गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. महाविद्यालयात शिकत असतांना मित्राच्या ओळखीने त्यांना 'किर्लोस्कर नाटक मंडळीत' नाट्यपदं लिहिण्याची संधी मिळाली व इथूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. इ. स. १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेले 'प्रेमसंन्यास' हे त्यांचे पहिले नाटक व त्यानंतर इ. स.१९१७ मध्ये पुण्यप्रभाव, इ. स. १९१९ मध्ये एकच प्याला व त्यानंतर भावबंधन ही नाटके आली. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही दिवस उपसंपादकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखनावरच आपला चरितार्थ चालवला. त्यांच्या लेखनातील ताजेपणा व टवटवीतपणा आजही वाचकांना अनुभवता येतो. गडकऱ्यांच्या विनोदी लेखनामुळेच मराठीमध्ये विनोदी लेखनाची परंपरा प्रवाही झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यातील एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत. "वाग्वैजयंती" नावाने त्यांच्या कविता संग्रहित केल्या आहेत. तसेच इतरही साहित्य त्यांनी आपल्या काळात लिहिलेले आहे. त्यांचे काही साहित्य त्यांच्या मृत्यू पश्चात प्रसिद्ध झाले. खरे तर मराठी रंगभूमीचा उल्लेख राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या "एकच प्याला" या अजरामर नाटकाखेरिज होऊच शकत नाही. एकच प्याला हे नाव उच्चारताच सर्व जगाचा नाश करणारा तो मद्याचा, राक्षसी "एकच प्याला" डोळ्यासमोर उभा राहतो आणि नाटकाच्या स्वरूपाची प्रेक्षकांना तात्काळ कल्पना येते. हेच त्यांच्या साहित्याचे श्रेष्ठत्व होय. गडकर्‍यांनी आपले "एकच प्याला" हे तिसरे नाटक इ. स. १९१९ च्या नोव्हेंबर मध्ये लिहून पूर्ण केले. गंधर्व नाटक मंडळींनी याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ रोजी केला. तर बळवंत नाटक मंडळीनी याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी १९२० रोजी सोलापुरात केला. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय सुधाकर, सिंधु, तळीराम, गीता अशा विविध पात्रांच्या माध्यमातून रेखाटून "एकच प्याला" मधून व्यसनमुक्तीचा संदेश राम गणेश गडकरी यांनी दिला. दारूच्या व्यसनामुळे सुधाकर सारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वतःच आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा नाश करून घेतो. ही भयानक गोष्ट गडकर्‍यांनी प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांसमोर परिणामकारक रीतीने मांडली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी ललित पूर्ण आणि नाट्यपूर्ण भाषेत या नाटकातून केली आहे. दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागले की त्याच्यापायी त्याचा आणि त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो. एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारक रीतीने मांडायचे होते. तेच त्यांनी मांडले. हेच त्यांच्या साहित्यकृतीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या महान साहित्यकृतीमुळेच त्यांना मराठी भाषेचे "शेक्सपियर" म्हटले जाते. त्यांच्या सर्वच लेखनात वाचकांच्या, प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ उतरले आहे. राम गणेश गडकरी यांच्या साहित्याचा मराठी मनावरील प्रभाव आजही टिकून आहे.
"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ।"
असे गोविंदाग्रज नावाने अप्रतिम काव्य लिहिणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. मराठी साहित्य क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे असे श्रेष्ठ मराठी नाटककार, मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी अल्पायुषी ठरले. २३ जानेवारी १९१९ ला वयाच्या ३४ व्या वर्षी या महान साहित्यिकाचे सावनेर, जि. नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या रूपाने ते अजरामर आहेत.



निलेशकुमार रामभाऊजी इंगोले 
मोर्शी, जि. अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार