नंदुरबार दि. 25 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी 2022 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9-15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.
एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लोटचा उद्रेक लक्षात घेता, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय सभेकरीता निर्धारित केलेल्या संख्येनुसार निमंत्रितांची उपस्थिती ठेवण्यात यावी. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई वडील तसेच कोरोनायोध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही मर्यादित नागरिकांनाच निमंत्रित करावे. सर्वासाठी मास्क बंधनकारक असेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333