नंदुरबार - येथील एका फार्मसी कॉलेजच्या प्राचार्याने महाविद्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नंदुरबार येथील औषध निर्माण (फार्मसी) महाविद्यालयातील संगणक चालक तुषार कुलकर्णी हे काही कामानिमित्त शुक्रवार दि.17 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी महाविद्यालयाच्या वरील मजल्यावर गेले असता त्यांना याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र शामराव चौधरी हे याच महाविद्यालयातील वरच्या मजल्यावरील खोली क्रमांक 2 मध्ये गळफास घेऊन मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आले. कुलकर्णी यांनी ही माहिती देताच उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भापकर आणि त्यांचे सहकारी लगेच घटनास्थळी धावून आले. उपनगर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा मृत्यूची नोंद करण्यात येऊन रात्री शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा घटना चर्चेत आली. आत्महत्येचे कारण काय असावे यावर चर्चा झडू लागल्या आहेत. दरम्यान प्राचार्य रवींद्र चौधरी यांच्या खिशातून पोलिसांना एक सुसाईड नोट प्राप्त झाली आहे. त्या चिठ्ठीत प्राचार्य चौधरी यांनी आर्थिक फसवणूक झाल्याचा ठपका ठेवला असून मुंबई व नाशिक येथील व्यक्तींकडे अंगुली निर्देश करणारे उल्लेख केले असल्याचे समजते. तथापि प्राचार्य चौधरी हे अत्यंत मनमिळावू म्हणून सर्वांना परिचित होते व त्यांच्या वर्तणुकीतून तणाव असल्याचे कधी दिसले नव्हते, असे त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्राचार्य चौधरी हे बऱ्हाणपूर जिल्ह्यातील (मध्यप्रदेश) शाहपुर येथील मूूळ रहिवासी होते. आज शनिवार रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान शाहपुर गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.