सुदर्शन न्युज नंदुरबारशहादा पं.स.च्या कनिष्ठ अभियंत्यांसह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
24 हजारांच्या लाचेची मागणी भोवली : नंदुरबार एसीबीची कारवाई
नंदुरबार : बिल काढून देण्यासाठी 24 हजारांच्या लाचेची मागणी करणार्या
शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता राजेश लक्ष्मण पाटील (41, शहादा) व टेंभली ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रविणसिंग कोमलसिंग गिरासे (40 रा.दोंडाईचा) यांना नंदुरबार एसीबीने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागितल्याचा पुरावा प्राप्त झाल्यानंतर गुन्हा
टेंभली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत होळ गुजरी ग्रामपंचायतीचे वस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे काम जनसुविधा 2515 योजनेंतर्गत करण्यासाठी नऊ लाख 99 हजारांच्या कामाची टेंभली ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली होती. हे काम संबंधित एजन्सीने तक्रारदार यांना सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिले होते व तसा करारनामा करण्यात आला होता. हे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाल्याने टेभर्ली ग्रामपंचायतीला नंदुरबार जिल्हा परीषदेने आठ लाख पाच हजार 200 रुपये रकमेचा धनादेश मार्च महिन्यात वर्ग केला परंतु रक्कम न मिळाल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी आरोपींना विचारणा केली असता राजेश पाटील यांनी नमूद कामाच्या संबंधाने तक्रारदाराकडे चेक काढून देण्यासाठी 8 जून 2020 रोजेी 24 हजारांची लाच मागितली होती व त्यास प्रवीणसिंग गिरासे यांनी प्रोत्साहन दिले होते. या प्रकरणी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणीनंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. तपासानंतर सोमवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील आदींच्या पथकाने केली.