नंदुरबार - तालुका हद्दीतील चोरी झालेल्या एका मोटर सायकलीचा छडा लावतांना नंदुरबार जिल्ह्यातील 6 तसेच धुळे जिल्ह्यातील 2 मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 12 मोटर सायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
तथापि एकीकडे पोलिसांना हे यश मिळत असतानाच काल 17 फेब्रुवारी रोजी शहादा तालुक्यात एकाच वेळी तीन ठिकाणाहून मोटरसायकली चोरी करून मोटरसायकल चोरांनी पोलिसांना मोठा धक्का दिला. शहादा पोलीस ठाण्यात काल झालेल्या 3 मोटर सायकल चोरीचे वेगवेगळेे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळदा येथून एक मोटर सायकल चोरीस गेली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग यांनी गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित करुन गुन्हा उघडकीस आणला. यासाठी हेडकाँस्टेबल सजन वाघ, प्रमोद सोनवणे, पोना विकास अजगे, विजय धिवरे, किरण पावरा, सतिश घुले यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील खेतीया पर्यंत जाऊन वेशांतर करुन तपास केला. माहितीनुसार मलफा ता. पानसेमल या गावी सापळा रचून संशयीत मनोज दत्तु चव्हाण रा. मलफा ता. पानसेमल यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने नंदुरबार तालुका हद्दीतील कोळदा येथुन मोटर सायकल चोरी केल्याचे मान्य केले. त्याचबरोबर विधी संघर्ष बालक असलेल्या 3 साथिदारांसमवेत अन्यत्र चोरी केल्याचे मान्य केले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथुन 3 , सारंगखेडा येथुन 2, नंदुरबार उपनगर हद्दितून तसेच धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथुन व दोंडाईचा येथुन प्रत्येकी 1 व इतर 3 अशा एकूण 12 मोटर सायकली काढून दिल्या. या आरोपीकडून इतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास सुरु आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांनी पार पाडली.