नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार, दि. २४ फेब्रुवारीला नागपूर शहरातील अस्थिव्यंग दिव्यांगांना सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण होणार आहे. वर्धा मार्गावरील एनरिको हाइट्स (हॉटेल रेडिसन ब्ल्यूच्या शेजारी) येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने नागपूर शहरात प्रथमच अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी सौर ऊर्जा चलित मोटराईज्ड ट्रायसिकल उपलब्ध होणार आहे. यासाठी विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) या संस्थेचे विशेष सहकार्य लाभत आहे. या माध्यमातून दिव्यांगांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासही ट्रायसिकलच्या निमित्ताने बळ मिळणार आहे. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत दिला जाणार आहे. समायोजित (अॅ डजस्टेबल) होऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.