आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. नरेंद्र मोदी यांचा हा २०१५ पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील. आणि अबुधाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील. त्यांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी दुबई येथे होणाऱ्या जागतिक सरकारी शिखर परिषदेत २०२४ मध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि शिखर परिषदेत विशेष भाषण करतील. तसेच, नरेंद्र मोदी अबू धाबीतील पहिले हिंदू मंदिर असलेल्या बीएपीएस मंदिराचे उद्घाटनही करतील आणि झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात यूएईमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील.