विदर्भ-मराठवाडा वैधानिक मंडळावरुन सरकारला, विरोधकांनी विधानपरिषदेतही घेरले- तुर्तास अर्थसंकल्पात निधीचे आश्वासन..मात्र संघर्षास तयार- डॉ.परिणय फुके.
मुंबई - ४ - विधानसभेप्रमाणे परिषदेतही विदर्भ-मराठवाडा वैधानिक मंडळावरुन सदस्य आक्रमक झाले. महविकास आघाडी प्रादेशिक अनुशेष वाढवत आहे, विदर्भ तसेच मराठवाड्यावर अन्याय केला जातोय असे गंभीर आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारवर हल्ला चढवला, आणि तातडीने सरकारने मंडळाला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा आग्रह केला. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या मागणीचा उल्लेख करत तुर्तास अर्थसंकल्पात विदर्भ तसेच मराठवाड्यास पुर्ण निधी देण्याचे आश्वासन दिले. सदस्यांचे या आश्वासनावर पुर्ण समाधान झाल्याचे दिसले नाही.
विदर्भ- मराठवाडा वैधानिक मंडळाला जाणिवपूर्वक मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची राज्य सरकारने पाठवलेल्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब न केल्यामुळे एक प्रकारे अडी ठेवून सरकारने वैधानिक मंडळाच्या माध्यमातून राज्यपालांना असलेले अधिकार कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. विधानसभेत पहिल्याच दिवशी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावर धारेवर धरलं, तसेच विधानपरिषधेतही सदस्य या मुद्द्यावर आक्रमक झाले. राज्यपाल जेव्हा 12 आमदार नियुक्त करतील तेव्हा मंडळांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव देऊ, ही भुमिका फार संताप आणणारी आहे, विदर्भ-मराठवाड्याच्या जनतेला 12 आमदार नियुक्त होत नाहीत म्हणून वेठीला धरणे याची किंमत सरकारला मोजावी लागेल..अशा सदस्यांच्या भावना होत्या. डॉ. परिणय फुके यांनी परिषदेत या मुद्द्यावर आक्रमक भुमिका घेतली- विदर्भ-मराठवाड्याला वेठीस धरण्याचे सरकारचे धोरण अत्यंत निषेधाचे आहे..सरकारने तात्काळ मंडळांना मुदतवाढ देणारा प्रस्ताव ठेवावा..आणि दोन्ही विभागाच्या वाट्याचा निधी वितरित करावा..अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर बोलताना आश्वासन दिले की अर्थसंकल्पात निधी देताना विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होणार नाही..मात्र सरकारची या मुद्यावर राजकीय भुमिका पाहता केवळ आश्वासन पुरेसे नाही, जर आमच्या भागावर अन्याय झाला तर संघर्षाला आम्ही कमी पडणार नाही आणि आमच्या हक्काचा निधी घेऊच असा इशारा डॉ. फुके यांनी दिला आहे.