सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निरामय कर्मयोगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

संतांची समृद्ध अशी परंपरा महाराष्ट्र भूमीला लाभलेली आहे.

Sudarshan MH
  • Apr 30 2021 7:51AM



संतांची समृद्ध अशी परंपरा महाराष्ट्र भूमीला लाभलेली आहे. पवित्र महाराष्ट्राच्या या भूमीत होऊन गेलेल्या संतांनी लोकांना जगण्याचे बळ दिले. त्याचबरोबर तत्त्वज्ञानाच्या पातळीवरून सर्वसामान्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य करून आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण भारतालाच नव्हे, तर जगालाही प्रभावित केले. 'हे विश्वची माझे घर' अशी सर्वव्यापक मानवतावादी शिकवण संतांनी संपूर्ण मानवजातीला दिली. अशा महान संतांच्या विचारातील मानवतावादी विचारांचा प्रवाह, लोकोद्धाराची परंपरा विसाव्या शतकात पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. त्यांची आज जयंती.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील यावली (शहीद) या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर आणि आईचे नाव मंजुळाबाई होते. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर होते. बारशाच्या दिवशी अकोट येथील श्रीहरी बुवा आणि माधानचे श्री गुलाबराव महाराज यांच्या हस्ते त्यांचे "माणिकदेव" असे नामकरण करण्यात आले. तसेच वरखेडच्या श्रीसंत आडकोजी महाराजांनी त्यांना तुकड्या म्हणून संबोधले. तेव्हापासून माणिकला तुकड्या म्हणू लागले. पुढे ते तुकड्याचे तुकड्यादास झाले. लहानपणापासूनच त्यांच्यावर आध्यात्मिक विचारांचा प्रभाव होता. कीर्तन व भजन तुकडोजी महाराजांचा लहानपणीचा छंद होता. त्यामुळे त्यांचे लक्ष शाळेच्या चार भिंतीत रमले नाही. तिसरीनंतर त्यांनी शाळेचा निरोप घेतला आणि वरखेडला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात रमले. जीवनानुभवातून त्यांनी समाजातील लोकांच्या हाल-अपेष्टा, अज्ञान आणि दारिद्र्य तसेच शहाण्यासुरल्या लोकांचा खुळेपणा जवळून पाहिला होता. त्यामुळे समाजात असलेली विषमता, अंधश्रद्धा, देव संकल्पनेसारखा लोकांचा भ्रामक विचार नाहीसा करण्यासाठी भजन, भाषण प्रवचन आणि सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी लोकहृदय परिवर्तनाचे कार्य आरंभिले. राष्ट्रसंतांनी आपल्या अद्भुत भजन आणि अनमोल भाषणातून सारा भारतीय समाज काळनिद्रेतून जागा केला. त्यांनी मराठी व हिंदीतून अनेक काव्यरचना केल्या. राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केला होता. व्यक्तींच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या व विश्वाच्या कल्याणाचा विचार या प्रार्थनेत अंतर्भूत होता. सामुदायिक प्रार्थनेतून सहजपणे चित्तशुद्धी होते, मानसिक शांती लागते आणि माणुसकीची भावना वाढीस लागते. परंतु राष्ट्रसंतांना सामुदायिक प्रार्थनेतुन विश्वप्रेम, विश्वशांती आणि विश्वधर्म अशा त्रिवेणी सुविचारांची गंगा सामुदायिक मानसभूमीत निर्माण करायची होती. मानव विकासासाठी धर्माचा अवलंब करणे ही त्यांची संकल्पना होती. परंतु, धार्मिकता अथवा धर्मांधता त्यांच्यात नव्हतीच. त्यांनी कधीही कोणत्याही एका धर्माची बाजू घेऊन स्वतःचे विचार लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांची वृत्ती कायम धर्मनिरपेक्ष होती.  भारतीय समाज जाती, भाषा, धर्म, पंथ, प्रांत, वंश या आधारे विभाजित झाला होता. त्यांच्यात एकात्मता निर्माण करणे आवश्यक होते. त्यांनी प्रत्येक धर्माचा, त्यांच्या तत्त्वाचा आयुष्यभर आदर केला. प्रत्येक धर्मात मानव कल्याणासाठी जी तत्वे उपयोगी दिसली त्यांचा स्वीकार करून महाराजांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्मियांना त्यांनी आपल्या कार्यात सामावून घेतले. सर्व मानव जोपर्यंत एक मनाने, प्रेमाने, सहयोगाने, गुण्यागोविंदाने एकत्र राहत नाही तोपर्यंत मानव जातीचा सर्वांगीण विकास होणार नाही हे त्यांनी वारंवार समाजमनावर विंबवून सर्वधर्मसमभावनेचे दर्शन घडवून दिले. 'हे विश्वची माझे घर' अशी सर्वव्यापक मानवतावादी शिकवण त्यांनी मानवाला दिली. एवढेच नव्हे तर भारताबाहेरही इतर देशात जाऊन त्यांनी मानवताधर्म पटवून दिला. जपानला जाऊन विश्वधर्म आणि विश्वशांती परिषदेला  आपल्या अमोघ वाणीने मोहित करून टाकले आणि विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. जागतिक शांततेसाठी मानवताधर्माचा विचार जगासमोर मांडला. राष्ट्रोन्नती करण्यासाठी राष्ट्राच्या विकासात त्यांनी शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन मानले. शिक्षणाचे महत्त्व वर्णन करताना राष्ट्रसंत म्हणतात,
"विद्येअंगी व्हावा विनय ।  विद्या करी स्वतंत्र, निर्भय ।
शिक्षणाने वाढावा निश्चय । जीवन-जय कराया ॥२०॥"
शिक्षण हे मानवाचा सर्वांगीण विकास करणारे असले पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाने विनयशीलता, स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, निश्चय आणि जीवनात यश प्राप्त करणे शक्य आहे असे त्यांचे मत आहे. समाजाच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी स्त्रियांच्या विकासावरही भर दिला आहे. स्त्रियांचा विकास झाला नाही, तर राष्ट्राची दुर्गती आहे. स्त्री आत्मनिर्भर, सुरक्षित व स्वतंत्र बाण्याची होणे राष्ट्रहिताचे आहे असे राष्ट्रसंतांचे मत होते. त्यासाठी त्यांनी महिलांसाठी मोझरीच्या गुरुदेव सेवाश्रमात स्वतंत्र महिला मंडळ संघटित केले. त्यांनी केलेल्या ग्रामगीतेत महिला विकास हा महत्त्वाचा घटक आहे. समाजाच्या प्रत्येक अंगाला स्पर्शून त्यांनी कार्य केले. सामाजिक जागृती बरोबरच राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर देशोन्नतीसाठी स्वतःला आजन्म वाहून घेतलेले ते एक महान लोकसंत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी इ.स.१९३० च्या सत्याग्रहात सहभाग घेऊन त्यांनी राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार केला. 
"झाडू झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना,
पत्थर सारे बम बनेंगे,...
गुलामी अब न होना हमारे भारत में"
अशा शेकडो भजनाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी समाज प्रबोधन व जनजागृती केली आणि लोकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याची ज्योत प्रज्वलित केली. इ.स.१९४२ मध्ये चले जाव आंदोलन देशात सुरू झाले. १९४२ च्या आंदोलनात ते एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणारे एक प्रेरणास्त्रोत होते. राष्ट्रीय चळवळीतील एक महान संघटक होते. महाराजांनी स्वातंत्र्य चळवळीला आपल्या प्रबोधनाने प्रेरित केल्यामुळे त्यांना अटक सुध्दा करण्यात आली. देशालाच देव मानणाऱ्या या थोर संताविषयी वर्णन करतांना प्राचार्य रा.तू.भगत म्हणतात की, "भूदान यज्ञ, गोवा - हैदराबाद मुक्ती संग्राम, राष्ट्रभाषा प्रचार, भारत सेवक समाज, भारत साधू समाज आणि ग्रामनवनिर्माण यासाठी भारतभर दौरे काढून त्यांनी केलेल्या कार्याचा डोळस मागोवा घेतला तर राष्ट्रसंत म्हणजे राष्ट्रचेतना, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती जनमनात निर्माण करणारे एक फिरते विद्यापीठच होते." त्यांच्याठायी वसत असलेले उत्कट राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रोद्धारासाठी आयोजिलेले कार्यक्रम यामुळेच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना "राष्ट्रसंत" या उपाधीने गौरविले. सामाजिक बंधुभावनेची रुजवणूक, स्त्री-पुरुष समानता, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव संपविणे, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, इत्यादी दृष्टीने त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. आदर्श जीवन जगतांना सदाचारातून सुखाकडे, श्रमातून आनंदाकडे, देवभक्तीतुन देशभक्तीकडे आणि शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग राष्ट्रसंतांनी प्रशस्त केला. भजन, कीर्तन, ग्रामोध्दार, राष्ट्रविकास, व्याख्यानातून लोकशिक्षण, देशाची संपन्नता, स्वातंत्र्यचळवळीत सहभाग, विश्वमानवतावादी संकल्पना अशा मौलिकतेवर लक्ष केंद्रित करून त्यांनी आपले जीवन समर्पित केले. या थोर राष्ट्रसंतांची ११ ऑक्टोबर १९६८ ला प्राणज्योत मालवली. परंतु विचाररूपाने ते आजही आपल्यात प्रेरणेच्या रूपाने जिवंत आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार भारतीय समाजालाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला प्रेरणादायक आहेत. राष्ट्रसंत अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे निरामय कर्मयोगी होते. भारत देशाला समृद्ध करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
 आजच्या परिस्थितीचा व मनःस्थितीचा विचार करता या विस्कटलेल्या काळात बंधुभावना, संघटितपणातच समाजाचे कल्याण आहे. हा राष्ट्रसंतांचा संदेश आज महत्त्वपूर्ण आहे.

निलेशकुमार रामभाऊजी इंगोले 
मोर्शी, जि.अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार