सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निःस्वार्थ कर्मयोगी माधव श्रीहरी अणे

बापूजी अणे यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला. कॉलेजमध्ये झालेल्या लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाचा प्रभाव बापूजी अणे यांच्यावर झाला. लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा व ध्येयवादाचा कायमचा ठसा बापूजींच्या जीवनावर उमटला.

अतुल सुधाकर गंजीवाले ९९२१५३१३०५
  • Aug 30 2020 2:06PM
मूळचे आंध्र प्रदेशातील परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्थायिक झालेल्या ‘अणे’ कुटुंबात २९ ऑगस्ट १८८० रोजी माधव श्रीहरी उपाख्य बापुजी अणे यांचा जन्म झाला . बालपणापासून प्राचीन भारतीय संस्कृतीचे सर्व संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चालू असताना बापूजींना त्यांच्या कुटूंबातून प्राचीन वळणाचे शिक्षण दिले गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये झाले. वैचारिक, सांस्कृतिक विषयाचे त्यांना जास्त आकर्षण होते, तसेच इंग्रजी व संस्कृत वाड:मय या विषयाकडे त्यांचा जास्त कल होता. मॉरिस कॉलेजमध्ये असताना बापूजी अणे यांचा संपर्क लोकमान्य टिळकांशी आला. कॉलेजमध्ये झालेल्या लोकमान्य टिळकांच्या व्याख्यानाचा प्रभाव बापूजी अणे यांच्यावर झाला. लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा व ध्येयवादाचा कायमचा ठसा बापूजींच्या जीवनावर उमटला. लोकमान्य टिळकांची राजकारणाची परंपरा तर बापूजींनी चालवलीच पण त्यांची वेद,पुराण व वाड:मयाच्या अध्ययन-संशोधनाचीही परंपरा त्यांनी पुढे चालविली. लोकमान्य टिळकांना बापूजी गुरु मानीत. महाराष्ट्रातील लोक बापूजी अणे यांना लोकमान्य टिळकांइतकाच मान देत असत आणि म्हणूनच बापूजी अणे ‘विदर्भाचे टिळक’ म्हणून देखील ओळखले जातात. बापूजी अणे यांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु अणे घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या अध्यापनाचा व्यवसाय चालू होता,त्यामुळे वडिलांची इच्छा बापूजींनी मान्य न करता अध्यापनाचा व्यवसाय करावयाचे ठरविले. याचे कारण, सरकारी नोकरी करीत असताना राष्ट्रीय वृत्ती व सेवाभाव जोपासला जाणे त्यांना अवघड वाटले. राष्ट्रीय वृत्तीची जोपासना केली जावी या हेतूने स्थापन झालेल्या अमरावतीच्या ‘काशीबाई हायस्कूलमध्ये’ बापूजींनी शिक्षक म्हणून प्रवेश केला. बापूजींवर झालेल्या घरातील व शाळा-महाविद्यालयातील संस्कारांचा प्रभाव त्यांच्या अध्यापनातून अनुभवास येत होता. अध्यापन कुशलतेमुळे ते विद्यार्थीवर्गात प्रिय होते. बापूजी अणे यांच्या मते, “ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक ,शारीरिक व मानसिक विकास साधला जावा तसेच शिक्षण हे देवसेवा व देशसेवा यांची जाण निर्माण करण्यास पोषक असावे ”. शारीरिक, मानसिक ,नैतिक शक्तींचा ऱ्हास करणाऱ्या शिक्षणपद्धतीचा बापूजींनी कायम विरोध केला. आपल्या ‘युवाशक्तीस आवाहन’ या लेखात बापूजी म्हणतात,”ज्या शिक्षणाच्या योगाने देशसेवा व देव सेवा यांचा उद्भव विद्यार्थ्यांच्या मनात होईल असे शिक्षण विद्यार्थ्यास दिले पाहिजे. शिक्षणपद्धतीतून जर असे शिक्षण मिळत नसेल तर हा त्या शिक्षण पद्धतीतील दोष आहे. हा दोष दूर करण्याचे कर्तव्य लोकनेत्यांचे आहे.” बापूजी विद्यार्थ्यांबाबत बोलताना म्हणतात, “विद्यार्थ्यांनी स्वदेश सेवा व स्वधर्माचे शिक्षण मिळेल अशा ठिकाणी शिक्षण घ्यावे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी करारीपणा बाळगावा तसेच आज्ञाधारकता, विनयशीलता, अभ्यासूवृत्ती, चिकाटी, देशभक्ती, समाजसेवा या गुणांची जोपासना करावी.” बापूजी यांच्या मते, विद्यार्थ्यांनी सत्याच्या रक्षणासाठी व असत्याला शासन करण्याचे धैर्य अंगी बाळगावे. विद्यार्थ्यांनी जातीयता, प्रांतिकभेद व राष्ट्रविघातक विचारांपासून दूर राहावयास हवे. अभ्यासक्रमाबाबत बोलतांना बापूजी म्हणत, ”विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, राष्ट्रीयत्वाची भावना, आंतरराष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणारा अभ्यासक्रम शाळा, महाविद्यालयांनी राबवावयास हवा, तरच भारतीय तरुण येणाऱ्या नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतील.” तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचावी या उदात्त हेतुने बापूजी अणे यांनी यवतमाळ येथे १९२८ साली ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’ ची स्थापना केली, हेच हायस्कूल आज ‘लोकनायक बापूजी अणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ म्हणून ओळखले जाते. तसेच यवतमाळ येथील दत्तचौक येथे असलेले स्व:तचे राहते घर शैक्षणिक कार्यासाठी बापूजी अणे यांनी उपलब्ध करून दिले. या ठिकाणी आज लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय सुरू आहे. या दोन्ही वास्तू लोकनायक बापूजी अणे यांच्या शिक्षण विषयक तळमळीची साक्ष देत आहेत. लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच बापूजी अणे यांच्या जीवनावर महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम झाला होता. वैचारिक विरोध असला तरी गांधीजींच्या ‘निशस्त्र प्रतिकार’ या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला बापूजींचा पाठिंबा होता. इंग्रजांच्या विरोधात गांधीजींनी ‘कायदेभंग चळवळी’ अंतर्गत साबरमती येथे मिठाचा सत्याग्रह सुरू केला. परंतु हा सत्याग्रह समुद्र नसलेल्या विदर्भासारख्या प्रदेशात घेणे शक्य नव्हते,त्यामुळे वैचारिक प्रगल्भता असलेल्या बापूजी अणे यांनी जंगल संपदा लाभलेल्या विदर्भात ‘जंगलचा कायदा’ भंग करण्याचे ठरवले. याचे कारण जंगलचा कायदा हा लोकांना आणि विशेषकरून शेतकऱ्यांना जाचक झाला होता. ‘जंगलच्या बंद भागातील गवत विनापरवाना कापून आणणे’ असे या कायदेभंग सत्याग्रहाचे स्वरूप होते. या सत्याग्रहाचा प्रारंभ कराण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यामधील ‘धुंदी’ गावानजीकचे जंगल निवडण्यात आले आणि ठरल्याप्रमाणे १० जुलै १९३० रोजी हा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहामुळे बापूजीना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. अभ्यासूवृत्तीच्या बापूजींनी तुरुंगातदेखील महाभारताचा अभ्यास केला . बापूजी अणे यांचे आवडते विषय म्हणजे वैदिक वाड:मय, तत्त्वज्ञान, इतिहास. बापूजी अणे यांनी मराठी व संस्कृत साहित्य क्षेत्रातही मौलिक कार्य केले आहे. ‘गणपती देवता’,प्राचीन संस्कृती विषयक लेख, लोकमान्य टिळक यांच्यावर संस्कृतमध्ये लिहिलेला ‘श्रीतिलकयशोर्णव’ हा ८५ तरंगातील सुमारे १२,००० श्लोकांचा विशाल ग्रंथ एक महाकाव्याच होय. ‘तिलकयशोर्णव’ या महाकाव्यासाठी बापूजी अणे यांना १९७३ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक स्फुटकाव्ये लिहिली. त्यांचे राजकीय,सामाजिक, शैक्षणिक विषयावरील अनेक लेख त्यांच्या उत्कृष्ट लेखक असल्याची साक्ष देतात. ‘विदर्भ साहित्य संघ’ स्थापनेतही बापूजींचा पुढाकार होता. यवतमाळला वकीलीला प्रारंभ केलेल्या बापूजींनी राजकीय चळवळ केंद्रित करण्यासाठी आणि लोकमत संघटित करण्यासाठी इसवीसन १९१५ च्या गुढीपाडव्याला ‘यवतमाळ जिल्हा सभा’ स्थापन केली. १९२६ साली यवतमाळ जिल्हा सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून लोकनायक बापूजी अणे यांची नियुक्ती झाली. यवतमाळ जिल्हा सभा हि शेतकऱ्यांच्या दैनंदिन गैरसोयीची फिर्याद, कुळातील तंटे व ‘Land Revenue Code Bill’ दुरुस्तीचा कायदा, जिल्हापरिषद, गावपंचायती,स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण,सत्याग्रह या व अशा अनेक विषयांना अनुसरून काम करीत असे. आजही यवतमाळ मध्ये ‘यवतमाळ जिल्हा सभेचे’ कार्य सुरु आहे. लोकनायक बापूजी अणे यांनी आपल्या राजकीय कालखंडात विदर्भ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे सदस्य, नेहरू कमिटीचे सचिव, अखिल भारतीय काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष, राष्ट्रीय पक्षाचे सचिव, लो.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती, सिलोन मध्ये भारत शासनाचे प्रतिनिधी, बिहार राज्याचे राज्यपाल, नागपूर उमरेड मतदारसंघातून खासदार अशी अनेक पदे आपल्या जीवनकाळात भूषविली. बापूजी अणे स्वतःच्या मनाला योग्य वाटते आणि राष्ट्राला पोषक ठरते अशी कोणतीही गोष्ट करायला कधीही घाबरले नाहीत. बापूजी उदारमतवादी होते. त्यांनी प्रसिद्धीसाठी कधीही खटपट केली नाही. त्यांच्या सहवासात आलेला मनुष्य अगदी त्यांचाच होत असे. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे बापूजी अजातशत्रू ठरले. ध्येयनिष्ठा, कर्मनिष्ठा, गुरुनिष्ठा, तत्वनिष्ठा, निर्भयता, अभ्यासवृत्ती यामुळे बापूजींचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांच्यावरच्या जनतेच्या प्रेमामुळे जनतेने त्यांना ‘लोकनायक’ ही उपाधी बहाल केली होती. शिक्षक, वकील,वक्ता,साहित्यिक,संशोधक,कवी, धुरंदर राजकारणी,समाजसेवक अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पडणाऱ्या लोकनायक बापूजी अणे यांचा भारत सरकारने २६ जानेवारी १९६८ रोजी ‘पद्मविभूषण’ पदवीने सन्मान केला. तसेच त्यांच्या नावाने २९ ऑगस्ट २०११ रोजी डाक तिकीटही काढले,. ज्ञानयोगी, कर्मयोगी लोकनायक बापूजी अणे यांना विनम्र अभिवादन. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार