ग्रामीण आणि मागास भागातील, तसेच देशातील हस्तकलाकारांच्या उद्योग समूहांना आयआयटी, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक महाविद्यालयांशी जोडा. त्यामुळे उद्योगांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन येऊन उत्पादनाचा दर्जा अधिक चांगला होईल. तसेच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण उद्योगांची उलाढाल ही 5 लाख कोटींपर्यंत नेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सोमवारी नवी दिल्लीत एमएसएमईच्या 52 स्फूर्ती क्लस्टरचा शुभारंभ ना.गडकरी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी एमएसएमई राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 18 राज्यांमध्ये 52 क्लस्टर (समूह) सुरु झाले आहे. यामुळे विविध क्षेत्रातील 42 हजार हस्तकलाकारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 50 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी 5 हजार विविध क्लस्टरची सुरुवात होणे आवश्यक असून त्यादृष्टीने अधिकार्यांनी कारवाई करावी, अशा सूचना ना. गडकरी यांनी यावेळी दिल्या.
ते पुढे म्हणाले- उत्पादन अधिक हवेच पण ते अधिक लोकांचा सहभाग घेऊन हवे. पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे. देशात विकास होतो आहे, पण फक्त शहरी क्षेत्राचा. शहरी क्षेत्रासोबत ग्रामीण आणि मागास, आदिवासी क्षेत्राचा विकास झाला तर रोजगारासाठी कुणी शहराकडे येणार नाही. मागास, आदिवासी, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणारी धोरणे आखावी लागतील.
देशातील प्रत्येक खासदारांनी विविध उद्योगांची क्लस्टर निर्मिती त्यांच्या मतदारसंघात करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती करून ना. गडकरी म्हणाले- प्रत्येक खासदारांनी विविध क्षेत्रातील ह्स्तकलाकार एकत्र आणून किमान 10 क्लस्टरची निर्मिती करावी. ते प्रस्ताव एमएसएमईकडे पाठवावे. एमएसएमई आणि खादी ग्रामोद्योगाचे वेब पोर्टलही सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जगाची मागणी काय आहे, याचा अभ्यास करून हस्तकलाकारांनी आपले उत्पादन तयार करावे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- लोकांची बदलती आवड आणि बदलत असलेली नवीन पिढी यासोबत आम्हालाही बदलावे लागेल. पंतप्रधान सडक योजनेत डांबरी रस्त्यांसाठी आता 10 टक्के ‘वेस्ट रबर आणि प्लास्टिक’चा वापर करण्याचे बंधनकारक केले जावे. यामुळे शहरातील प्लास्टिक आणि रबर गोळा करणार्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल. शेतीसाठी सेंद्रिय कार्बन निर्मितीवर त्यांनी यावेळी भर दिला.
स्टीलचे वाढते भाव लक्षात घेता महामार्गांशेजारी उभारण्यात येणार्या स्टीलच्या बॅरिअरऐवजी आता नारळाचा दोर लावून बांबूचे बॅरिअर उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- यामुळे बॅरिअरसाठी लागणार्या 4 हजार कोटींच्या खर्चात बचत होईल. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटीसोबत स्मार्ट गावे बनवून ग्रामीण आणि मागास क्षेत्र सुखी, समृध्द आणि संपन्न बनविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.