लक्कडकोट ग्रामपंचायतचे सरपंच मिल्का भरत गावित यांनी पालकमंत्री के सि पाडवी व शिरीषकुमार नाईक यांना दिली लेखी तक्रार
नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे लक्कडकोट
(ता. नवापूर) येथे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, ग्रामस्थांना सुखासमाधाने जगू द्यावे अशी मागणी लक्कडकोट ग्रामपंचायतचे सरपंच मिल्का भरत गावित यांनी पालकमंत्री के सी पाडवी यांच्याकडे आज केली. खावटी किट वाटप करण्यासाठी नवापूर येथे पालकमंत्री आले असता त्यांना निवेदन देऊन अवैध धंद्या बाबत तक्रार केली आहे.
निवेदन देण्यासाठी यशवंत गावित, प्रकाश गावीत, कांतीलाल गावीत, दिलीप गावीत आदी उपस्थित होते.
लक्कडकोट सरपंच व ग्रामस्थ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लक्कडकोट येथे पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने अवैध धंदे सुरू आहेत ते बंद करण्यात यावे
लक्कडकोट येथे अवैधरित्या हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट सुरू करून त्यामध्ये देशी व विदेशी राज्यातील व परराज्यातील तसेच बोटलींगची अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अवैध हॉटेल ढाबे, रेस्टॉरंट मध्ये कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करीत आहेत. या ठिकाणी जुगार, सत्ता मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे.
पोलीस विभागाचे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी मिळून लक्कडकोट गावाला अवैद्य धंद्याचे मोठे हब बनवले आहे. पोलिस विभागाचे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली करत आहेत. सदर अवैध व्यवसायाला चालना देत आहेत.
या अवैध व्यवसाय बाबत पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना वेळोवेळी तक्रार निवेदन दिले आहेत. परंतु संबंधित कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. कारवाई केली तरी ती 'आम्ही मारल्या सारखे करु तुम्ही रडल्यासारखे करा' अशी असते. दुसऱ्या दिवसापासून अवैध धंदे पुन्हा सूरू केले जातात. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना अवैध धंदे करणारे व्यक्ती कोण कोण आहेत, आणि हे लोक कुठे कुठे अवैध धंदे करतात याची पूर्ण कल्पना आहे. तरी या व्यवसायिकांकडून लाखो रुपयांची हप्ते भेटत असल्याने संबंधित पोलिस खात्याचे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अधिकारी कुठलीही कारवाई करीत नाहीत. असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सर्व अवैध व्यवसाय, धंदे लक्कडकोट ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून चालवले जातात. येणारी- जाणारी व्यक्ती कोणती आहे याचे भान राहत नाही. नशेत असलेल्या व्यक्ती भांडण करतात, दारूच्या नशेत स्त्रियांची छेडछाड करतात असे अनेक प्रकारचे वाईट कृत्ये नियमित होत असतात. याबाबत वारंवार तक्रारी आहेत. तरी सदर परिसरातील स्थानिक नागरिक, व्यक्ती सुरक्षित नाहीत. रात्री-बेरात्री दिवसा घराच्या बाहेर निघण्यास घाबरतात.
सदर अवैध धंद्यांना ग्रामपंचायतीचा व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे व याबाबत तक्रारी आहेत, तरी ग्रामपंचायतीचा हद्दीत असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत व लक्कडकोट च्या ग्रामस्थांना सुखाने जगू द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
छायाचित्र : लक्कडकोट ( ता. नवापूर ) अवैध व्यवसायाबाबत तक्रार निवेदन पालकमंत्री के सी पाडवी व आमदार शिरीषकुमार नाईक यांना देतांना यशवंत गावित, प्रकाश गावीत, कांतीलाल गावीत, दिलीप गावीत.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333