सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कृषक क्रांतीचे प्रणेते डॉ.पंजाबराव देशमुख

महाराष्ट्रातील एक शिक्षण प्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख हे विदर्भातील एक लोकोत्तर व्यक्तित्त्व होते. त्यांचे कार्यक्षेत्र मूलतः विदर्भ असले तरी त्यांची दृष्टी केवळ राष्ट्रव्यापी नव्हे तर वैश्विक होती.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५
  • Dec 27 2020 3:59PM
डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ मध्ये अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. पापड सारख्या लहानशा खेड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेल्या या कृषकपुत्राने स्वतः उच्च विद्याविभूषित होऊन कर्तव्यभावनेने खेड्यापाड्यातल्या सहस्त्रावधी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडून दिली. शेतकरी कुटुंबात जन्मल्याने भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनातील सुख-दुःख, दारिद्र्य, अडी-अडचणी त्यांनी स्वतः अनुभवल्या होत्या. त्यातूनच त्यांचे कृषी विकासाचे ध्येय आकाराला आले होते. २७ डिसेंबर १८९८ ते १० एप्रिल १९६५ हा त्यांचा उज्वल जीवनकाल म्हणजेच भारतातील कृषक क्रांतीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होय. लोकांचे दारिद्र्य आणि अज्ञान दूर करणे व भारताचा सर्वांगीण विकास साधणे हे त्यांचे ध्येय होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत हे लक्षात घेऊन भाऊसाहेबांनी कृषी विकास हाच भारतीय प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरविला आणि आपले सर्व प्रयत्न, सर्व जीवन त्याकरिता खर्ची घातले. शेतकर्‍यांना दारिद्र्यातून मुक्त केल्याशिवाय कृषक समाज व देश समृद्ध होणार नाही आणि स्वतंत्र बनणार नाही असे त्यांना वाटे. शेतकरी व शेतमजूर भारतीय समाजव्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा कणा आहे हे जाणूनच त्यांनी त्यांच्या उद्धारासाठी कार्य केले. भारतीय शेतकरी क्रांतीला एक नैसर्गिक आणि सामाजिक घटना म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांनी मानले. जिथे उत्पादकांचे दारिद्र्य आहे तेथे समाजाचा नाश आहे, अधोगती आहे. म्हणून राष्ट्रीय दारिद्र्य नष्ट करण्यासाठी कृषक क्रांतीचा मार्ग डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अनुसरला होता. जगामध्ये अनेक लोकचळवळी व जन आंदोलने झालीत, परंतु या सर्व चळवळी व आंदोलने त्यावेळच्या एखाद्या विशिष्ट सामाजिक किंवा धार्मिक प्रश्नांशी निगडित होत्या. स्वातंत्र्यापूर्वी भारतात झालेल्या चळवळी सुद्धा मुख्यता राजकीय व सामाजिक होत्या. या सर्व चळवळींमध्ये कुठेही शेती व्यवस्था व अन्नदाता शेतकरी केंद्रस्थानी असलेला दिसत नाही. शेतकऱ्यांची दुष्काळ, नापिकी व शेतीसाठी घेतलेल्या कर्जापायी सावकार वर्गाकडून होत असलेली पिळवणूक, त्याद्वारे होणारे हालअपेष्टा दूर करणे व त्यांना जाचातून मुक्त करण्याची व्यवस्था उभी करणे याकडे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोणीही लक्ष दिले नव्हते. डॉ.पंजाबराव देशमुख यांनी अशी चळवळ भारतात प्रथमच उभी केली. त्यांची ही लोक चळवळ कृषी विकास, शिक्षण व्यवस्था व सामाजिक सुधारणा या त्रिसूत्रीवर आधारित होती. याकरिता त्यांनी आपले सर्व आयुष्य, आपली जमीन, पैसा, विद्वत्ता, प्रतिष्ठा या चळवळीत झोकून दिली. भाऊसाहेब लोक नेते होते. त्यांनी शेती विकासाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन त्याला विकसित तंत्रज्ञान देऊन, समजावून सांगून, शेती उत्पादन वाढविण्यास प्रवृत्त केले. भाऊसाहेबांना अभिप्रेत असलेली कृषी क्रांती केवळ आर्थिक विकासावर अवलंबून नव्हती, तर समाजाच्या सर्वांगीण विकासावर आधारित होती. वैज्ञानिक दृष्टी आणि बुद्धिवादाची कास धरल्याशिवाय कोणतीही क्रांती यशस्वी होत नाही अशी विचारधारा बहुजन समाजात निर्माण करण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी लोकविद्यापीठाची स्थापना केली व ग्रामीण बहुजनाला आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा दिली. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. कृषिमंत्री होण्यापूर्वीही तसेच भारताचे कृषिमंत्री व काही काळ सरकार मंत्री या नात्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अन्न, कृषि, वन, मत्स्योत्पादन, ग्रामीण पुनर्रचना व कृषी उत्पादकांचे संघटन या क्षेत्रातील त्यांचे कार्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. शेतकऱ्यांची कर्जातून मुक्त करणारा "कर्ज लवाद कायदा" पारित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण, कृषी, समाजसेवा, संसदीय कामकाज, ग्रामविकास या क्षेत्रात केलेले केलेले कार्य खूप महत्वपूर्ण आहे. पण त्यांच्या कार्याचा अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे शेतकऱ्यांच्या विकासाचा त्यांनी घेतलेला ध्यास होय. त्यासाठी त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली. शेतकरी संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी वर्तमानपत्र चालविले. त्याचप्रमाणे भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. कृषी क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी १९६० मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरविले. भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून १९५२ ते १९६२ पर्यंत त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक कार्य केले. त्यांच्या या महान कार्यामुळे कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आले. शिक्षण क्षेत्रात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपाने त्यांनी खरेखुरे लोकविद्यापीठ साकार केले. शेतकरी या एका आसाभोवती भाऊसाहेबांचे जीवन चक्र फिरत राहिले. शेतकऱ्यांसाठी कामे करीत त्यांचे आयुष्य गेले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार करीतच त्यांनी दिनांक १० एप्रिल १९६५ रोजी देह ठेवला. भाऊसाहेबांचे जीवन म्हणजे कृषकांसाठी केलेल्या क्रांतीचे महापर्व होय. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने १९८६ मध्ये त्यांना "कृषिरत्न" या पदवीने मरणोत्तर विभूषित केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषिविषयक विचारांचा व धोरणांचा आदर्श घेऊन व अवलंब करून आजच्या शेतकऱ्यांच्या व शेतीच्या समस्यांवर बदलत्या काळानुसार उपाययोजना करून शेतकरी हिताच्या दृष्टीने कृषी क्षेत्रात विकास व परिवर्तन करणे गरजेचे आहे. त्यातूनच शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास साधता येईल व शेतीप्रधान भारत देशाला बळकट करता येईल.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार