सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नरकेसरी - लोकमान्य

“लोकमान्य”. “उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता | नर रूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता || या धीट, मराठी, कणखर आणि ताठ बाण्याच्या निष्कलंक, लोकनायक, नररत्नास म्हणजेच नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्यांच्या शताब्दी वर्षीय, पुण्यतिथी निमित्त, शत शत प्रणाम.

श्रीकांत तिजारे ९४२३३८३९६६
  • Jul 30 2020 6:37PM
“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥“ जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो, असा विश्वास भगवान कृष्ण अर्जुनाला देतात. १८५७ च्या पराभवानंतर हिंदुस्तातील जनता पराभवाने गलितगात्र झाली होती. अशा वेळी स्वातंत्र्याचा ध्यास मनात बाळगून, एका ध्येयाने प्रेरित होवून, ऐन तारुण्यात, इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज बुलंद करण्याच कार्य टिळकांनी केलं. या हजरजबाबी व्यक्तिमत्वाचा, जन्म झाला तो २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे. केशव गंगाधर टिळक, हे नाव आहे लोकमान्य बबाळ गंगाधर टिळक यांचं. सततच सत्याचा पुरस्कार करणारे, स्वाभिमानी असे टिळक बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. “मी शेंगा खाल्या नाही, मी टरफल उचलणार नाही”, असं कणखर आणि बाणेदार उत्तर आपल्या शिक्षकांना देणारे बाळ गंगाधर टिळक, हे अत्यंत स्पष्टवक्ते आणि बेधडक व्यक्तीमत्वाचे स्वामी होते. म्हणूनच आजही त्यांचा गौरव “ती धीट मराठी मूर्ती, कणखर ताठ”, असा केला जातो. बालपणापासूनच अत्यंत स्वतंत्र विचार सरणी असणारे, क्रांतिवीरांच्या कथा ऐकतांना उत्तेजित होणारे आणि बालपणा पासूनच “मी सुद्धा मातृभूमीची सेवा करीन”, असा दृढ संकल्प करणारे, लोकमान्य टिळक. मन, मनगट, आणि मस्तिष्क बळकट असेल तरच देशकार्य करू शकू, हा भाव मनात येताच, एक वर्षभर नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेवून, त्यांनी स्वत:ला तयार केलं. एक उत्तम मल्ल आणि जलतरणपटू म्हणजेच पट्टीचे पोहणारे असा नाव लोकिक मिळविला. इंग्रजांचे वर्चस्व असताना, भारत भूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारी, त्यासाठी तन, मन, धन समर्पित करणाऱ्या रत्नापैकी, बाळ गंगाधर टिळक हे एक दैदिप्यमान रत्न. ते म्हणायचे “ज्या अर्थी मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे ठरविले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की कायद्याचे ज्ञान मला उपयोगी पडेल. मला वाटत नाही की माझे यायुष्य ब्रिटीशसाम्राज्य विरोधात संघर्षा शिवाय व्यतीत होईल”. गणित आणि संस्कृत सारख्या विषयात उच्च श्रेणीत B.A. होवूनही, L.L.B. करणारे लोकमान्य दृढनिश्चयी तसेच दूरदृष्टीचे होते. सरकारी नोकरी करायची नाही आणि संपूर्ण जीवन देशकार्यासाठी समर्पित करायचं असा दृढ निश्चय त्यांनी महाविद्यालयीन जीवनात केला, आणि तो पूर्णत्वास नेला. इंग्रजी भाषेला “वाघीणीच दुध” असं संबोधणारे टिळकच. देशात, सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य झालं पाहिजे, या विचारांनी टिळक प्रेरित होते. पारतंत्र्याचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचविणे ही त्या काळाची गरज होती. स्वातंत्र्या विषयी जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे, लोक संघटन करेणे, त्यांना निर्भय बनवणे, जनतेला संघटीत करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक होते. अलिप्त, भारतीय समाजाला, सभोवताली घडणाऱ्या घटनांचा, निरपेक्ष अहवाल देता यावा, या हेतूने प्रेरित होवून, ४ जानेवारी १८८१ रोजी, “केसरी” हे मराठी आणि “मराठा” हे इंग्रजी अशी दोन साप्ताहिक वर्तमानपत्रे त्यांनी सुरु केली. लोकशिक्षण, जनजागृती, राजकीय जागृती, शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे यामागील मुख्य उद्देश होते. यात त्यांना सहकार्य लाभले ते त्यांचे महाविद्यालयीन सहपाठी, श्री गोपाळ गणेश आगरकर यांचे. त्या काळची समविचारी मंडळी म्हणजे, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. केसरी वर्तमानपत्र हे “दृष्टीकोनपत्र” (View Paper) होतं, ते नुसतं “बातमीपत्र” (NewsPaper) नव्हतं. अत्यंत सोप्या परंतु, ओजस्वी, प्रभावशाली लिखाणामुळे, जनमानस हळूहळू जागे होवू लागले. तत्वज्ञान आणि वास्तवता हेच त्यांच्या लिखाणाचे आधारस्तंभ होते. इंग्रज सरकारच्या कित्तेक अन्यायकारी गोष्टी उजेडात आणल्या. अल्पावधीतच ही दोन्ही वर्तमान पत्रे लोकप्रिय झालीत. लोकमान्यांनी त्यांनीच मांडलेल्या चतु:सूत्री बरहुकूम कार्य केलं. “स्वदेश”, “स्वराज्य”, “बहिष्कार”, “राष्ट्रीय शिक्षण”, हे ते चार बिंदू. स्वदेशीचे विचार लोकमान्य टिळकांनी याच वृत्तपत्रांच्या माध्यमातून घराघरात पोहचविले. हे चार पवित्र शब्द लोकमान्यांनी लोकांना शिकविले. या नरपुंगवाच्या हाती इंग्रजी सत्तेविरूद्ध लढण्यासाठी “केसरी” हे शस्त्र होतं. स्वदेशीचे आंदोलन, या साप्ताहिकाच्या द्वारे, लेखांच्या आधारे घराघरात पोहचविले. स्वदेश विषयी प्रेम आणि पारतंत्र्या विषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. म्हणूनच त्यांना “भारतीय असंतोषाचे जनक” म्हटले जाते. सन १८९० ते १८९७ या सात वर्षाच्या काळात ते धुरंधर राजकारणी म्हणून पुढे आले. आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. स्वत:च जीवन राष्ट्रा करिता समर्पित केलं. भारतात, राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच” हा नारा देवून त्यांनी समाजात नवचैतन्य निर्माण केलं. इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले गेलं. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेलं “केसरी” आता स्वातंत्र्याच्या लढ्याचे मुखपत्र बनलं. टिळकांचे “अग्रलेख” हा केसरीचा “आत्मा” होता. चाळीस वर्षांच्या काळात लोकमान्य टिळकांनी आपल्या वृत्तपत्रांतून ५१३ अग्रलेख लिहिलेत. जनतेच्या दु:खाचे सविस्तर विवेचन आणि वास्तविक घटनांचा त्यात उल्लेख असल्याने अनेकांना ते आपलेसे वाटायचे तर काहिंना ते बोचरं व्हायचे. केसरीच्या अग्रलेखांची भाषा अधिक सोपी, नाट्यपूर्ण लोकभाषा होती. या लोकभाषेचा वापर करून लोकमान्यांनी जनतेमधील संकोच, अल्पसंतुष्टता, संशय व अज्ञान दूर केले. लोकांना जागृत करून जागेवर आणले. त्यासाठी पांडित्यापेक्षा परखड बोलीभाषा जरुरी होती. वृत्तापेक्षा लोकांना “विचार” आवडत. केसरी देशमुक्तीची एक सेवा म्हणून भक्तीने वाचला जाई. इंग्रजांनी प्लेगचे रोगी तपासण्याच्या निमित्ताने, पुण्यातील जनतेवर केलेल्या अत्याचारांच्या विरोधात, लोकमान्यांनी अग्रलेख लिहिले. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” आणि “राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!”, या ‘केसरी’तील अग्रलेखांचा आधार घेत १८९७ -१८९८ मध्ये टिळकांवर राष्ट्रद्रोहाचा पहिला अभियोग होऊन, त्यांना १८ महिन्यांची सक्तिमजुरीची शिक्षा झाली. लोकमान्यांच्या, स्वदेशहित चिंतन आणि देशाच्या समृद्धीसाठी देह समर्पण या मुलभूत सिद्धांतावर, केसरीतील अग्रलेख आधारलेले होते. हे अग्रलेख म्हणजे विचारांची “गरुडझेप”च. “उजाडले पण सूर्य कुठे आहे?’, “टिळक सुटले, पुढे काय?”, “प्रिन्सिपाल, शिशुपाल की पशुपाल”, “टोणग्याचे आचळ”, “हे आमचे गुरूच नव्हेत”, “बादशहा, ब्राह्मण झाले”, हे त्या काळात गाजलेले अग्रलेख. अन्यायाविरुद्ध लढण्याची जहालवृत्ती लोकमान्य टिळकांच्या लिखाणात असायची. त्यांच्या लेखणीला धार होती. त्यांचे विचार वाचून आणि ऐकून इंगजी सत्ता घायाळचं व्हायची. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी म्हणजेच १९०८ ते १९१४ या दरम्यान ब्रह्मदेशातील “मंडाले”च्या तुरुंगात सहा वर्षे त्यांना काढावी लागली. या दरम्यान त्यांनी रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध याचं वाचन केलं. याच मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी ”गीता रहस्य” हा ग्रंथ चार महिन्यात लिहिला. या सहा वर्षाच्या कालखंडात लोकमान्य टिळकांनी चारशे पुस्तकांचा संग्रह केला. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो| त्वदीय गुणसंकीर्तन ध्वनी कर्णी पडो॥ स्वदेश हितचिंतनावीण दुजी कथा नावडो| तुझ्यासमयी आमुची तनुही देशकार्यी पडो॥ श्री न. चिं. केळकरांनी, लोकमान्यांवरच्या भक्तीभावाने लिहिलेलं हे 'टिळक स्मृती स्मरण', आम्ही देशवासियांनी अंगिकारले, तर एक समर्थ भारत घडेल. स्वावलंबन आणि स्वार्थत्याग हा लोकांच्या उन्नतीचा मार्ग आहे असं ते वारंवार प्रतिपादन करीत. आजही, नवीन भारत, आत्म निर्भर भारताच्या यशस्वितेसाठी स्वदेश-भारतीय, स्वराज्य-शोषणमुक्त प्रणाली, बहिष्कार-चीनी मालाचा, राष्ट्रीय शिक्षण-सर्वांगीण विकासासाठी, या चार बिंदूवर परिस्थिती बरहुकूम विचार व्हायला हवा. प्रचंड धारणाशक्ती, तीव्र स्मरणशक्ती, थोर विचार, कार्यनिष्ठ, वज्रनिर्धार आणि विद्वान असूनही जनसामान्यांमध्ये एकरूप झालेले, तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून गणले गेलेले, व्यक्तिमत्व म्हणजे “लोकमान्य”. “उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता | नर रूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता || या धीट, मराठी, कणखर आणि ताठ बाण्याच्या निष्कलंक, लोकनायक, नररत्नास म्हणजेच नरकेसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्यांच्या शताब्दी वर्षीय, पुण्यतिथी निमित्त, शत शत प्रणाम.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार