(नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे)
नवापूर तालुक्यातील जामनपाडा येथे एका नाराधमाने सात वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. तब्बल १४ दिवसानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली असून सुनिल साऱ्या गावित असे संशयित आरोपीचे नाव आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात पोस्को कलम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापुर तालुक्यातील जामनपाडा गावात एका अल्पवयीन सात वर्षीय बालिकेवर घरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन दि. १ जून रोजी संशयित आरोपी सुनील साकऱ्या गावित वय २८ याने बळजबरीने अतिप्रसंग करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन बालिकेस वेदना होत असल्याने बालिकेच्या पालकांनी त्या बालिकेस वैद्यकीय उपचारासाठी नवापूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता सदर बालिकेस अधिक वेदना होत असल्यामुळे आईने बालिकेस विश्वासात घेतल्यावर सदरील घडलेल्या घटनेची माहिती दिली. तात्काळ पीडितेच्या आईने विसरवाडी पोलीस स्टेशन गाठून संशयित आरोपी विरुद्ध कलम ३७५ (अ) (ब) , पोस्को कलम ४ व ६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सदर घटनेची माहिती घेऊन तक्रार दाखल करून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनेचे गांभीर्य घेऊन संशयित आरोपीस तात्काळ अटक केली.