सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सेनापती दत्ताजी शिंदे यांचा आज बलिदान दिवस.

10 जानेवारी 1760 रोजी अफगाणी रोहिल्यांशी लढताना बुरारी ग्राउंड येथे आले होते वीरमरण

Abhimanyu
  • Jan 10 2021 9:30PM
दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे  द्वितीय पुत्र, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र भाऊ. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. ...या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांत मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर असामींनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करून त्याची डोलाची अंबारी खालीं पाडली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता (१७५१). त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापती करुन व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून त्याचा पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला (१७५७). जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेत खून झाला, त्या मोहिमेतही दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेवून बिजेसिंगाचा मोड केला व (जून १७५५). पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली (१७५६). नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले (१७५६). पुढील सालीं दादासाहेब (?) अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत.

यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले (१७५८). त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबाने (?) सांगितलेल्या नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावानें "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील" असे उद्‍गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला.

उज्जैनहून निघून चुलतेपुतणे दिल्लीस आले. पेशव्यानें(?) त्याला नजीबाचें पारिपत्य, बंगाल काबीज करणे, लाहोर सोडविणे, काशी प्रयाग घेणे व पुष्कळ पैसा घेऊन दादासाहेबाने (?) केलेंले स्वारी कर्ज फेडणें वगैरे कामें सांगितली होती. पेशव्यांचा 'दत्ताजी चित्तावर धरील ते करील' असा भरंवसा होता, मध्यंतरी तोफांच्या प्रकरणावरून दत्ताजीचें व गाजीउद्दीनाचें भांडण झालें होते. नंतर त्याने अबदालीच्या सुभेदारापासून लाहोर घेतलें (एप्रिल १७५८) व परत यमुनाकाठी रामघाटास दाखल झाला (मे). यावेळीं सरकारी कर्जाची ५० लाखांची वर्गत त्याच्यावर आली होती.

यावेळी दिल्ली मराठ्यांच्या ताब्यांत कायमची गेल्यासारखी झाल्याने नजीबाने व बादशहाने गुप्‍तपणें पत्रे लिहून अबदालीस ताबडतोब बोलाविलें व दत्ताजीस भागीरथीवर पूल बांधून देण्याच्या गुळचट थापा देऊन स्वस्थ बसविलें. याप्रमाणें नजीबाने सहा महिने (एप्रिल ते आक्टोबर) पुलाच्या थापेवर त्याला झुलविलें व त्याच्या विरुद्ध आपली सर्व तयारी चालविली आणि आंतून सर्व मुसुलमानांशी कारस्थानें करुन नोव्हेंबरांत अबदालीस दत्ताजीवर आणवून त्यास कैचीत पकडले.

आतां दत्ताजीस नजीबाचे कपट उमगले; परंतु आतां त्याचा कांही उपयोग नव्हता. गंगेचा पूल नजीबाच्या ताब्यांत होता आणि तो तर अबदालीला उघड मदत करीत होता. अशा वेळींहि दत्ताजीने एकाएकीं नजीबावर स्वारी करुन त्याला शुक्रतालाहून हांकलून गंगेपलीकडे रेटलें. ही लढाई मातब्बर होऊन तींत जनकोजी व दत्ताजी दोघेहि जखमी परंतु विजयी झाले (आक्टोबर). यावेळीं नजीबानें त्याच्याशी तात्पुरता तह केला; सुजाने हरिद्वाराच्या गंगेचे नाकें दाबून धरल्याने व अबदाली कुरुक्षेत्रास आल्याने, दत्ताजीनें गंगापार जाण्याचें रहित करुन कुरुक्षेत्री अबदालीची गांठ घेतली (२२ डिसेंबर). याप्रमाणें दत्ताजी हा घेरला गेला व हें सर्व कृत्य नजीबाने केले. त्याचप्रमाणें सुजानेहि एक कोट रु. खंडणी देण्याची थाप देऊन दत्ताजीस शुक्रतालास अबदाली येईपर्यंत अडकवून ठेविलें.

यावेळीं दत्ताजी मागें अहमदशहा अबदाली व पुढें रोहिले अशा कैचींत सांपडला होता. जर मागे सरून तो जयपूरकडे वळता तर प्रसंग टळता; परंतु मागे सरणे त्या शूर पुरुषास आवडेना. त्यानें जनकोजी व कबिले यांनी दिल्लीस पाठवून दिले शुक्रताल सोडून कुंजपुर्‍यास यमुना उतरून अहमदहहा अबदालीची गांठ घेतली, व त्या दिवशीं त्याचा पराभव केला (२४ डिसेंबर १७५९). परंतु लागलीच अबदाली कुंजपुर्‍यास यमुनापार होऊन नजीब, सुजा व अहंमद बंगश यांस मिळाला. याप्रमाणें एकंदर सर्व मुसुलमान एक झाले व दत्ताजी एकटा पडला. हें समजल्यावर मल्हाररावास त्याच्या मदतीस जाण्याबद्दल पेशव्यांनी अनेकदां हुकूम पाठविले, परंतु तो मुद्दामच जयपूरकडे रेंगाळत राहिला. तसेच पेशव्यांकडून मदत मिळेना परंतु माघार घ्यावयाचीच नाहीं या वाण्याने दत्ताजीनें लढायचे ठरवले . शेवटी दत्ताजी दिल्लीस येऊन (जाने. १७६०) जनकोजीस मिळाला. तेव्हांहि जनकोजीने व पदरच्या सर्व मंडळीने त्याला परत फिरण्याचा सल्ला दिला पण अपेश घेऊन श्रीमंतांस काय तोंड दाखविणे, असें म्हणून त्यानें तो नाकारला. नंतर युद्धाचा मुकाबला निश्चित करुन, पार होण्यासाठीं यमुनेचा ठाव पहातां तो लागेना व गिलच्यांचे लोक तर उलट नदी उतरून अलीकडे येऊन हल्ले करुं लागले हें पाहून दत्ताजी चिडला. शेवटी संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटून, तयारी करुन हत्ती यमुनेंत घालून व त्यांच्या पायांत अंदू घालून, तीन घटका दिवसास दत्ताजीने गिलच्यांशी युद्ध सुरू केलें (१० जानेवारी १७६०). गिलच्यानें आपल्या तोंडावर असलेल्या जानराव वाबळे, बयाजी शिंदे व गोविंदपंत बुंदेले या सर्वांनां मागे रेटून यमुना उतरून व पांच घटकांत पांचशें मराठे ठार मारुन थेट जरीपटक्यावरच चाल केली. तेव्हां सर्वत्र धुंद झाली. गिलच्यांच्या तोफांचा व बंदुकांचा मारा फार होऊ लागला. तेव्हां जिवाची तमा सोडून उभयतां पाटीलबावा निशाण बचावण्यासाठी झोंंबू लागले. जागा फार अडचणीची, नदीतीर, शेरणीची बेटे; त्यांत मराठे अडकले. हत्तीवरील आठवी घटका वाजली. तो जनकोजीच्या दंडास गोळी लागून तो बेशुद्ध झाला. तें पहातांच दत्ताजीने जोरानें गिलच्यांवर घोडे घातले. इतक्यांत यशवंत जगदळे पडला. त्याचें प्रेत काढण्यास दत्ताजी गेला, तों उजव्या बरगडींत गोळी लागून तो घोड्याखाली आला. त्यावेळीं अबदालीकडील शहानें त्याला विचारिलें कीं, 'पटेल, हमारे साथ लढेंगे?' त्यास त्या शूर पुरुषाने उत्तर दिलें कीं, " बचेंगे तो औरभी लढेंगे". परंतु याच वेळी त्याचा प्राण निघून गेला. ही बदाऊंघाटाची लढाई होय.

मराठ्यांच्या इतिहासांत जे हृदयद्रावक व शौर्याचे प्रसंग घडले, त्यांपैकीं दत्ताजीचा हा प्रसंग होय. शिंदे घराण्यांत दत्ताजी, जनकोजी, जयाप्पा, महादजींसारखे एक एक पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार