सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठी साहित्याचा मानदंड, प्रतिभावंत साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस

मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.

Sudarshan MH
  • Feb 27 2021 12:30PM
मराठी भाषा गौरव दिन
 
 
 
कुसुमाग्रज यांना साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान स्मरून कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी शासन निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० मध्येही कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे नमूद केले आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अधिक परिश्रम घेतले. विशाखा, जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह एक मोठा मराठी साहित्य ठेवा आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये त्यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. त्यांच्याच नाटकावर आधारित असलेला नटसम्राट हा चित्रपट अतिशय गाजला. त्यांचा जन्मदिन "मराठी भाषा गौरव" दिन म्हणून आपण साजरा करतो हा त्यांचा यथार्थ गौरव आहे. २७ फेब्रुवारी १९२२ ते १० मार्च १९९९ असा जीवनप्रवास लाभलेल्या कवी कुसुमाग्रज यांनी मराठी रसिकांवर अनेक दशके अधिराज्य गाजवले. आजही मराठी रसिकांवर त्यांच्या समृद्ध साहित्यविश्वाची मोहिनी आहे.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तसेच मराठी भाषा ही भारतीय संविधानातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषा आहे. कृ.पा.कुलकर्णी यांच्या मते, "मराठी भाषेचे वयोमान १३०० ते १४०० वर्षाचे ठरते." एवढ्या वर्षाचा इतिहास जपणारी मराठी ही प्राचीन भाषा आहे. मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके १११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील आद्य ग्रंथ होय. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनीही त्यांच्या साहित्यातून केला आहे. कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे कारण म्हणजे मराठी मातीत अनेक सत्तांनी राज्य केले. असे असतांनाही मराठी भाषा मात्र या परिवर्तनाला सामावून घेत अधिक समृद्ध झाली आहे. शिवछत्रपतींच्या काळातही राजकीय पत्रव्यवहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. प्रत्येक काळात त्या त्या काळातील साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनात जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आजपर्यंत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्य कवी निर्माण झालेले आहे आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. जात, धर्म, पंथ, भेद मिटवून मराठी माणसाला एकत्र बांधून ठेवण्याच्या मराठी भाषेच्या सामर्थ्याचे वर्णन करताना कवी सुरेश भट म्हणतात,
 
 "आम्हास लाभले भाग्य बोलतो मराठी; जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी; एवढ्या जगात माय मानतो मराठी."
 
 आज अनेक क्षेत्रात मराठी भाषा मूळ धरू लागली आहे. परंतु तिचे संवर्धन करणे, मराठी भाषेचा गौरव, वैभव, सौंदर्य टिकून ठेवणे हे प्रत्येक मराठी माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. देशाच्या कोणत्याही प्रांतात मराठी बोलणारी व्यक्ती दिसली की महाराष्ट्रीयन म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. यावरून मराठी भाषेवरून महाराष्ट्र राज्याची ओळख देणारी ही मराठी भाषा अभिजात भाषा आहे. परंतु शासनस्तरावर मात्र मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून अद्याप मान्यता मिळालेली नाही. शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही समस्त मराठी जनांची मागणी आहे. कारण मराठी जनांनी नतमस्तक व्हावे अशी मराठी भाषा आहे. हे मांडतांना वि.मा.कुलकर्णी म्हणतात,
"माझ्या मराठीची थोरी; नित्य नवे रुप दावी, 
अवनत होई माथा, मुखी उमटते ओवी." 
 
आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्याच्या दृष्टीने पावले उचलावी व मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता द्यावी हीच अपेक्षा.
 
निलेशकुमार रामभाऊजी इंगोले 
मोर्शी, जि.अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार