सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक तंबाखू विरोधी दिन

संपूर्ण जगातील तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांना तंबाखूमुक्त करून निरोगी बनविण्यासाठी आणि तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी जनजागृती

Senhal Joshi MH
  • May 31 2021 11:07AM


संपूर्ण जगातील तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांना तंबाखूमुक्त करून निरोगी बनविण्यासाठी आणि तंबाखूचे आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी ३१ मे हा दिवस संपूर्ण जगात 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो. जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. या दिनाचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे, तंबाखूचा वापर थांबविण्यासाठी जगभरातून प्रयत्न करणे व तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जागतिक पातळीवर लोकांची जनजागृती करणे हा आहे.

आजच्या काळात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक विपरीत परिणाम होतात हे माहिती असूनही तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढतच आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम देशाच्या विकास प्रक्रियेवरही होतो. कारण तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींमुळे त्या देशांना मनुष्यबळाला मुकावे लागते. अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात. त्यामुळे तंबाखूचे व्यसन देशाच्या विकासातील मोठा अडथळा ठरतो. हा विकासातील अडथळा वेळीच दूर करण्यासाठी त्याची कारणे शोधून उपाययोजना केल्या पाहिजे. तंबाखूच्या सेवनाची सुरुवात कुटुंब, परिसरातून होते. म्हणूनच कुटुंबातील मोठ्या व्यक्तींची जबाबदारी फार मोठी आहे. कारण लहान बालके मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांचे घरातील लहान बालकांसमोर सेवन करणे तसेच त्यांना अशा वस्तू विकत आणायला लावणे हानीकारक ठरते. त्यातूनच तेही पुढे व्यसनाच्या आहारी जातात. सोबतच मोठ्यांच्या वर्तनाविषयी उत्सुकता म्हणून अनेकदा अशा गोष्टींचा आस्वाद घेण्याचे प्रकार घडतात व त्यातून व्यसन जडते. कधी-कधी तर मित्रमंडळीत चला मजा करू या, एक वेळ केले तर काय होते ? म्हणून सहज या गोष्टी केल्या जातात व तेच व्यसनाचे कारण ठरते. एवढेच नव्हे, तर आता सिनेमातील नायक कशा प्रकारच्या स्टाईलने व्यसन करतो, ती सिनेस्टाईल जोपासण्यातुनही अनेक व्यक्ती व्यसनाकडे वळतांना दिसतात. परंतु सिनेमांमध्ये असे काही दाखवतांना पडद्यावर "धूम्रपान शरीरास हानिकारक आहे" असे लिहून येते. पण त्याकडे मात्र चक्क दुर्लक्ष केले जाते. त्याचप्रमाणे  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर सुध्दा "तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो" असे लिहून ग्राहकांना तंबाखू हा एक प्रकारचा हानिकारक पदार्थ असल्याचे सांगितले जाते. परंतु व्यसनाच्या हव्यासापायी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जाते व शरीरास हानिकारक पदार्थ ग्रहण केले जातात. तंबाखू सेवनाच्या विविध प्रकारांनी जडलेल्या या सवयी खूप घातक ठरतात. नव्हे तर आयुष्याची माती करतात. तंबाखूच्या सेवनातून मेंदूला जी निकोटीनची सवय जडते ती खूप हानिकारक आहे. कारण नियमित तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला तंबाखूचे सेवन न केल्यास अस्वस्थ होणे, थरथरणे, काम करण्यास मन न लागणे, मनात वाईट विचार येणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ज्या व्यक्ती विकासातील बाधा आहेत. तसेच या व्यसनांमुळे भूक न लागणे, आतड्यांची कार्यक्षमता मंदावने, छातीत दुखणे, मेंदूचा विकार, फुफ्फुस व श्वसन संस्थेचे वारंवार आजार होणे, श्वसनलिका आणि पोटात व्रण होणे, रक्तदाब वाढणे, प्रदीर्घ धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा; तोंडाचा; घशाचा कर्करोग होतो, त्याचप्रमाणे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अर्कामुळे तोंडातील त्वचेवर दुष्परिणाम होते. एवढेच नव्हे तर तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन करणाऱ्यांना काही दिवसांनी तोंड उघडणेही अशक्य होते. मानवाला मृत्यूच्या दाढेत ओढणारे हे सर्व आजार मानवनिर्मित आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आहेत. त्यामुळे तंबाखूच्या सेवनाचा त्याग करून व तंबाखूवर बंदी घालून आपल्याला यापासून सुटका मिळवता येते. त्यामुळेच जागतिक स्तरावर तंबाखूच्या वापरावर बंदी घालणे व त्यावर अंकुश ठेवणे फार महत्त्वाचे आहे. याच दृष्टिकोनातून "तंबाखूमुक्त युवक संदेश" अभियान तथा सन २००८ चा जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करतांना जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखूचे उत्पादन, प्रचार, जाहिरात अशा गोष्टींवर बंदी घातली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही सरकारने गुटखा बंदीचा निर्णय घेऊन अतिशय चांगले व लोकहिताचे पाऊल उचलले आहे. तरीपण तंबाखूची पाळे-मुळे संपूर्णतः नष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यासाठी निरंतर प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कोणत्याही गोष्टीबाबत एका व्यक्तीचा परिणाम संपूर्ण कुटुंब, समाज आणि देशावर होतो. म्हणूनच एका व्यक्तीचे तंबाखू सेवन हे सुध्दा व्यक्तीच्या स्वतःच्या, समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या हितासाठी चांगले नाही. विकसित देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भावी पिढी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे. म्हणूनच भावी नागरिक असणारा आजचा विद्यार्थी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. यासाठीच शाळांमधून विविध प्रकारे तंबाखूमुक्त अभियान राबवले जात आहे. यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने चालवलेला "तंबाखूमुक्त शाळा" उपक्रम खरच महत्त्वपूर्ण आहे व शालेय जीवनापासूनच व्यसनमुक्तीचा पाया घालणारा आहे. तसेच दरवर्षी प्रजासत्ताक दिनी शाळेमार्फत विद्यार्थी, शिक्षक पालक व गावकऱ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन, रॅली काढून जनजागृती केली जाते. असेच उपक्रम संपूर्ण देशभर आणि जगभर राबविणे तंबाखूमुक्ती साठी महत्वपूर्ण आहेत. या उपक्रमांसोबतच व्यक्तीने जीवनात चांगल्या सवयी अंगी बाणवने, खेळ खेळणे, जीवनात मोठे स्वप्न बघून ते ध्येय जोपासणे व्यसनमुक्तीसाठी आवश्यक आहे. तसेच तंबाखूचे व्यसन लागू नये व तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना तंबाखूमुक्त करण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या  व्यक्तीला ते सोडतांना अस्वस्थ वाटू लागल्यास त्याने एखादी आवड जोपासून त्यात मनाला गुंतवणे, जीवनशैलीत बदल करून नवनवीन गोष्टींचा छंद जोपासणे, तंबाखूचे सेवन सोडण्यास वैद्यकीय उपचारांचा उपयोग करणे तथा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर जाणे अशा उपाययोजनांवर भर दिल्यास तंबाखूमुक्तीचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल. त्यातूनच प्रत्येक व्यक्ती उद्याचा व्यसनमुक्त व आरोग्यसंपन्न नागरिक बनून स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करून देशाच्या विकासात आपला वाटा उचलेल. यासोबतच व्यक्ती विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहील. देशाचा सृजाण नागरिक म्हणून व आपले नैतिक कर्तव्य समजून प्रत्येक व्यक्तीने तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम इतरांना समजावून सांगून आपल्या आजूबाजूला तंबाखू सेवन करणाऱ्या एका व्यक्तीला तरी तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच आपला देश व संपूर्ण विश्व तंबाखूमुक्त होईल.


निलेशकुमार रामभाऊजी इंगोले 
मोर्शी, जि. अमरावती
९३७११४५१९५

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार