सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठी पत्रकारीतेचे जनक,आद्य संपादक,दर्पणकार बालशास्त्री जाम्भेकर यांच्या पवित्र स्मृतिस !

मराठी पत्रकारीतेचे जनक बालशास्त्री जाम्भेकर यांच्या पवित्र स्मृतिस

Sudarshan MH
  • Jan 6 2021 1:07PM

महाराष्ट्राला मराठी पत्रकारितेची समृद्ध परंपरा लाभली आहे. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिश राजवटीमध्ये मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जातं. बाळशास्त्रींचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी कोकणातील देवगड तालुक्यामधील पोंभुर्ले येथे झाला आणि जणू मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या आकाशात एक तेजस्वी तारा उदयास आला. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने जांभेकरांनी ६ जानेवारी १८३१ रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा शुभारंभ केला. या अद्वितीय घटनेची मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ६ जानेवारी हा दिवस राज्य शासनातर्फे ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. चला तर, पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकूया.

 

जांभेकरांचा कालखंड हा पारतंत्र्याचा होता. तत्कालीन काळात पत्रकारिता क्षेत्राला व्यवसायाचे स्वरुप अजिबात नव्हते. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करुन समाजप्रबोधनातून स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्याचं ‘दर्पण’चे मुख्य लक्ष्य होतं. “पाहा आपले प्रतिबिंब, अन् मगच ठरवा,” या मथळ्याचा अग्रलेख प्रसिद्ध करुन बाळशास्त्रींनी जनमानसाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, याची जाणीव त्यांनी लोकांना करुन दिली. ब्रिटिश राजवटीतून मातृभूमीची मुक्तता करण्याचं व्रत घेऊन १९व्या शतकात जांभेकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केलं आणि त्यातून मराठी पत्रकारितेने आपल्या शक्तीचं दर्शन घडविलं. बाळशास्त्रींनी मराठी पत्रकारितेचा पाया रचून, माय मराठीला मोठा सन्मान मिळवून दिला. त्यावर सोनेरी कळस चढविला तो लोकमान्य टिळकांनी. लेखणीतून स्वराज्य स्थापनेचा दर्पणकारांचा संकल्प पूर्ण करण्याचा विडा अखेर टिळकांनी उचलला. ज्ञान-विज्ञानाचा प्रसार करणे व समाजाची सार्वजनिक नीतिमत्ता सुधारणे, हे काम वृत्तपत्रांचे आहे, ही गोष्ट बाळशास्त्रींनी ‘दर्पण’च्या माध्यमातून पत्रकारांच्या मनावर बिंववली. “आपले राज्य का गेले व इंग्रजांचे राज्य या देशात कसे आले, याचे अचूक निदान करणारी महाराष्ट्राची पहिली व्यक्ती म्हणजे दर्पणकार,” असे गौरवोद्गार आचार्य अत्रे यांनी काढले. आपला १८१२-१८४६ हा अल्पसा जीवनकाळ त्यांनी समाजप्रबोधन, ज्ञानोपासना व ज्ञानदान करण्यातच व्यतित केला. मराठी जनमानसाला सज्ञान करण्यात जांभेकरांनी आपले सारं आयुष्य पणाला लावलं. जांभेकरांचे मराठी, संस्कृत, बंगाली, इंग्रजी अशा एकूण नऊ भाषांवर प्रभुत्व होते. गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये काम केले. पाश्चात्त्य देशातील आधुनिक ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही, ही त्यांची भूमिका होती. सन १८३४ मध्ये बाळशास्त्रींची साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. अशी नेमणूक होण्याचा मान मिळविणारे ते पहिले भारतीय होते.

 

‘दर्पण’सह त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मासिकाची निर्मिती केली व जांभेकर हे मराठी भाषेतील मासिक प्रकाशित करणारे पहिले संपादक ठरले. इतकेच नव्हे तर, बाळशास्त्री हे इतिहासाचे आद्य संशोधक, संस्कृत पंडीत, पत्रकार, साहित्यकार, शब्दकोष निर्माते, ज्ञानेश्वरीचे आद्य ग्रंथ प्रकाशक, कुलाबा वेधशाळेचे ज्योतिर्निरीक्षक, आद्य समाजसुधारक, धर्मशास्त्रज्ञ, रॉयल एशियाटिक सोसायटीचे निबंधकार अशा वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जनहितार्थ बजावल्या. दादाभाई नौरोजी तर त्यांना गुरु मानत असत, यावरुन त्यांची महती समजावी. आचार्य जांभेकर हे स्त्रीमुक्तीचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. सती प्रथा, बालविवाह, केशवपन प्रथा यांना हद्दपार करण्याचं कार्य करुन विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिले. स्त्रियांमधील अज्ञान घालवून त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी बाळशास्त्रींनी स्त्री शिक्षणावर भर दिला. महिलांना शिक्षण देऊन त्यांना आपल्या सामाजिक हक्कांची जाणीव करुन द्यावी, यासाठी जांभेकरांनी अविरत प्रयत्न केले. मराठी पत्रकारितेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भावी पिढीतील पत्रकारांनी कर्तव्यबुद्धीने प्रयत्नशील राहावे, म्हणजे पत्रकार दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.

 

मित्रहो, २१व्या शतकात प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया यांच्यात प्रसिद्धीची चढाओढ सुरु झाली आहे. या स्पर्धेला थांबविणे आता अशक्यप्राय आहे. तथापि, वाचकांच्या अभिरुचीचा विचार करुन सत्यावर आधारित बातम्या प्रसिद्ध करण्यावर पत्रकारांनी अधिकाधिक भर द्यावा. कुठल्याही पक्षाची तमा न बाळगता, वास्तवावर प्रकाश टाकावा. पत्रकारितेला घातक असलेल्या ‘पेडन्यूज’पासून वृत्तपत्रांनी दूर राहावे, तसेच केवळ व्यावसायिक द़ृष्टिकोन न बाळगता, सामाजिक जाणीव ठेवून वस्तुनिष्ठ लिखाण लोकांसमोर ठेवण्यास प्राधान्य द्यावे. राज्य शासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करावी. त्याचप्रमाणे त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सोई-सुविधा उपलब्ध करुन वयोवृद्ध पत्रकारांसाठी पेन्शन स्कीम जाहीर करावी. महत्त्वाचे म्हणजे, दर्पणकारांसह लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी आद्य संपादक-पत्रकारांनी पत्रकारितेला जे वैभव, जो सन्मान मिळवून दिला आहे, त्याचे जतन व संवर्धन करावे, म्हणजे हीच खरी दर्पणकारांना आदरांजली ठरेल.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार