गाझामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष संपण्याचे लक्षणं दिसत नाही आहे. यातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी लेबनॉनचे इराण समर्थक हिज्बुलाह गटाला मोठी धमकी दिली आहे. नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे, की 'हिज्बुल्लाहने इस्रायलसह तिसऱ्या लेबनॉन युद्धाची सुरुवात करु नये, नाहीतर आम्ही लेबनॉनची राजधानी बेरुतची अवस्था गाझा सारखी करु.' नेत्यानाहू यांनी ही खुली धमकी दिली आहे.
बेंजामिन नेत्यानाहू यांचं वक्तव्य अशावेळी समोर आलं आहे, ज्यावेळी हिज्बुल्लाहने एक गाईडेट मिसाईल हल्ला केला होता. या हल्ल्यात ६० वर्षांच्या इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर हिज्बुलाहचे समर्थक हमासला पाठिंबा देत हल्ले करत आहेत. अशावेळी त्यांना नेत्यानाहू यांनी थेट खुली धमकीच दिली आहे.
बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले, की “जर हिज्बुलाहने युद्ध सुरु करण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्हीही बेरुतची अवस्था गाझा आणि खान यूनिससारखी करु हे त्यांनी लक्षात ठेवावं. तसंच हल्ले सुरुच ठेवले तर ती वेळ लवकरच येईल हे विसरु नका. आम्ही जिंकण्यासाठी कटिबद्ध आहोत. इस्रायली सैन्याच्या मदतीने आम्ही हे युद्ध जिंकू.” अशी थेट धमकीच नेत्यानाहू यांनी दिली आहे.
बेंजामिन नेत्यानाहू हे लष्कराच्या मुख्यालयात पोहचले होते. त्यांच्यासह इस्रायलचे संरक्षण मंक्षी योव गॅलंट आणि लष्करप्रमुखही होते. नेत्यानाहू यांनी लष्करी सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचा उत्साह वाढवला. इस्रायली लष्कर उत्तम कामगिरी करत असल्याचंही नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.