परळी वैद्यनाथ: महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांना ऐन निवडणुकीत आणखी एक धक्का बसला असून, त्यांच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, अन्य सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या मुलेगाव ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्याने बजरंग सोनवणे यांना निश्चितच याचा फटका बसणार आहे. मुलेगावचे सरपंच तसेच कळमअंबा ग्रामपंचायत सदस्य यांसह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.