बीड: मी कधी जातीवाद केला का? मी कधी तुमची कामे अडवली का? सत्तेत असतांना कधी तुम्हांला त्रास दिला का? मी उमेदवार म्हणून तुम्हांला मान्य आहे का? असा संवाद साधत समोर ऐकण्यासाठी आतूर झालेल्या मतदारांना बोलते करत आणि त्यांच्याकडून सकारात्मक उत्तरे मिळवत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी भरपावसात नाळवंडी येथील संध्याकाळची सभा चांगलीच गाजवली. जिल्हयातील बहादूर जनता विकासाच्याच बाजूने मतं देईल असा मला विश्वास आहे,तुम्ही सर्वांनी मला या निवडणुकीत संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
नाळवंडी येथे पंकजाताई मुंडे यांची रात्री जाहीर सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला पण पंकजाताईंनी पावसाला न जुमानता तडाखेबंद भाषण केले. व्यासपीठावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना पंकजाताई म्हणाल्या, आताच कुणीतरी सांगितलं की बीडची निवडणूक वेगळयाच दिशेने जात आहे. पण मला असं वाटत नाही. इथली बहादूर जनता कधीही विकासाच्याच बाजूने मत देणार हा विश्वास मला आहे.माझ्या काळात पीक विम्याचे चार चार, पाच पाच कोटी रूपये आले हे तुम्ही बघितले की नाही. आला की नाही विमा, आलं की नाही अनुदान..मला माहितीयं तुम्हाला चिंता आहे सोयाबीनची, कापसाची..पण मी तुम्हाला वचन देते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बसून शेतकरी, कष्टकऱ्यांची चिंता दूर करण्यासाठी संसदेत चालले आहे. मी उमेदवार म्हणून योग्य आहे का? मी कधी जातीवाद केला का..कधी धर्माचं राजकारण केलं का? असा सवाल त्यांनी जनतेला करताच समोरून सर्वांनी एका आवाजात सकारात्मक उत्तरं दिली.
बोलून नाही करून दाखवलं...
विरोधकांकडे अफवा पसरविणे आणि बुध्दीभेद करणे याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा नाही. सत्तेत असताना जिल्हयात विकासाची असंख्य कामे केली. आम्ही केवळ बोलत नाहीत तर करून दाखवतो. आज मला पंतप्रधान मोदींनी ही संधी दिलीय.पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळे ही संधी वाया घालू नका. मला जिल्हयाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताईंनी यावेळी केलं.
अन् मोबाईल टाॅर्चच्या उजेडात सभा उजळली...
सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला आणि त्यातच अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता समोर बसलेल्या सर्वानीच आपापले मोबाईल काढून त्याच्या टाॅर्चच्या उजेडात आपल्या लाडक्या लेकीची सभा ऐकली. पाऊस आणि लाईटच्या व्यत्ययाची पर्वा न करता सभेला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पंकजाताईंना मताधिक्य देण्यासाठी जनता किती आतूर आहे, याचा प्रत्यय आला.